जकात घोटाळा करणाऱ्या सहा जणांना अटक Print

बनावट पावत्यांच्या आधारे महापालिकेची फसवणूक
प्रतिनिधी
ठाणे
बनावट जकात पावत्यांद्वारे ठाणे महापलिका आणि शासनाचा ८० लाखांहून अधिक किमतीचा महसूल बुडवणाऱ्या सहा जणांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या अटकेमुळे जकात नाक्यांवर सुरू असलेला सावळागोंधळ पुन्हा एकदा उघडकीस आला असून या घोटाळ्याची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.  
अतिष गायकवाड (३३), दीपक खरात (३२), विकास डोंगरे (३५), संदीप मोरे (३५), संदेश कदम (३६), सागर गवारी (२६) आणि नागेश सुर्वे (३१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे महापालिकेच्या काही जकात नाक्यांवर बनावट पावत्यांच्या आधारे वसुली होत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेस मिळाली होती. खोटय़ा पावत्या तयार करून जकातीस फाटा देऊन गाडय़ा परस्पर सोडण्याचे रॅकेट गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. मध्यंतरी ठाण्यातील काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही अशाप्रकारे जकात बुडवली जात असल्याची ओरड केली होती. गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जोशी यांना आपल्या सहकाऱ्यांसह कळवा येथील शिवाजी हॉस्पिटल जवळ सापळा रचला होता. यावेळी बनावट पावत्यांच्या आधारे काही व्यक्ती जकात भरवयास येणाऱ्या वाहनांकडून बळजबरीने वसुली करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी त्वरित कारवाई करून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट पावत्या, कागदपत्रे, संगणक, स्कॅनर, प्रिंटर यांसारखे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत कळवा पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली असून गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.