सागर नाईक यांची फेरनिवड निश्चित Print

नवी मुंबई महापौर निवडणूक
उपमहापौरपदासाठी अशोक गावडे यांना उमेदवारी
प्रतिनिधी
नवी मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईचे पुढील अडीच वर्षांचे महापौरपद आपल्याच घरात राहील याची काळजी घेत पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी सकाळी महापौरपदासाठी पुन्हा एकदा आपले पुतणे सागर नाईक यांचे नाव जाहीर केले. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्पष्ट बहुमत असल्याने सागर यांची महापौरपदी फेरनिवड पक्की मानली जात आहे. उपमहापौरपदासाठी नेरूळ येथील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गावडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. येत्या नऊ नोव्हेंबर रोजी या दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहाता निवडीची औपचारिकता शिल्लक राहिली आहे.  
दरम्यान, उपमहापौरपदासाठी शिवराम पाटील यांची उमेदवारी जाहीर करू नये यासाठी राष्ट्रवादीच्या २५ नगरसेवकांनी सकाळी विद्यमान महापौर सागर नाईक यांची भेट घेतली. तसेच शिवराम यांना उपमहापौरपद देत असाल तर आम्ही राजीनामा देतो, असा इशाराही या नगरसेवकांनी दिला. गणेश नाईक यांचेही शिवराम यांच्यासोबत फारसे सख्य नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या नगरसेवकांचा दबाव वाढताच गावडे यांची उमेदवारी जाहीर करून नाईक यांनी पक्षात खदखद निर्माण करणाऱ्या स्वकीयांनाही धक्का दिल्याची चर्चा आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीत पोरसवदा असलेल्या सागर यांची निवड करून गणेश नाईक यांनी घराणेशाहीचा शिक्का पुन्हा एकदा आपल्या माथी लावून घेतला होता. दरम्यान, मागील अडीच वर्षांत सागर यांनी महापालिकेच्या कामकाजावर चांगली पकड मिळवल्याने राष्ट्रवादीतील बहुतांश नगरसेवकांनी त्यांची यापदासाठी फेरनिवड केली जावी, अशी मागणी केली होती. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर महापौरपदाची माळ इतर कुणाच्या गळ्यात टाकणे नाईक यांनाही परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून सागर यांची फेरनिवड केली जाईल हे निश्चित मानले जात होते. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सकाळी बेलापूर येथील रेतीबंदर येथे घेण्यात आलेल्या नगरसेवकांच्या एका बैठकीत महापौरपदासाठी सागर नाईक यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. उपमहापौरपदासाठी पक्षात मोठी चुरस होती.
मात्र, शहरात असलेला पुणे जिल्ह्य़ातील मतदारांचा भरणा लक्षात घेऊन अशोक गावडे यांचे नाव यापदासाठी जाहीर करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांचे एकेकाळचे समर्थक म्हणून गावडे ओळखले जातात.     

कॉंग्रेस, शिवसेनेत नाराजी
शिवसेनेकडून महापौरपदासाठी चंद्रकांत रामाणे, तर उपमहापौरपदासाठी सुरेखा पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अर्ज भरण्याची दुपारी एक वाजेची वेळ टळून गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचा आरोप शिवसेना तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनी केल्याने महापालिका मुख्यालयात काही काळ खळबळ ऊडाली.