सिलिंडरची खरोखरच ‘गूडन्यूज’ मिळणार का ? Print

खास प्रतिनिधी
मुंबई
तीन सिलिंडर अनुदानाच्या रक्कमेत देण्यावरून सध्या घोळ सुरू असतानाच केंद्र सरकारच्या पातळीवरच ही मर्यादा वाढविण्याचा विचार सुरू झाल्याने थोडे थांबावे, असा पर्याय पुढे आला होता. पण राष्ट्रवादीचा दबाव आणि दिवाळीपूर्वी ‘गूडन्यूज’ देण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेले आश्वासन यामुळे निर्णय घेतला तरी त्याची लगेचच अंमलबजावणी केली जाणार नाही, अशी चिन्हे आहेत.
दिवाळीपूर्वी सिलिंडरचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री चव्हाण आणि वित्तमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा आणि वित्त खात्यांची मान्यता नसल्याने गेल्या आठवडय़ात हा प्रस्ताव रोखण्यात आला होता. मुख्यमंत्री चव्हाण यांची कोंडी करण्याकरिता सरसकट सर्वाना ही सवलत मिळाली पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. सर्वाना ही सवलत दिल्यास २४०० कोटींचा बोजा पडेल. दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना ही सवलत दिल्यास ४०० कोटींचा भार तिजोरीवर पडू शकतो. सफेद शिधापत्रिकाधारकांना ही सवलत देऊ नये, अशीही योजना आहे.
दिल्ली, हरयाणा आणि आसाम या काँग्रेसशासीत राज्यांनी तीन सिलिंडरचा निर्णय घेतला असला तरी या संदर्भातील आदेश अद्याप काढण्यात आलेला नाही. या धर्तीवरच सिलिंडरचा निर्णय घ्यायचा पण त्याची लगेचच अंमलबजावणी केली जाणार नाही, असे सांगण्यात आले.