स्पॅनिश तरुणीच्या बलात्काऱ्यास अटक Print

प्रतिनिधी
मुंबई
वांद्रे येथे स्पॅनिश तरुणीवरील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार मोहम्मद अली अन्वर अन्सारी ऊर्फ बादशाह याला अटक केली आहे. पीडित तरुणीनेही या आरोपीला ओळखल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास वांद्रे येथील पेरी रोडवरील पेरीडॉट इमारतीतील स्पॅनिश तरुणीच्या घरात हा आरोपी घुसला होता. चोरीच्या उद्देशाने त्याने घरात खिडकीतून प्रवेश मिळवला होता. त्यावेळी ही तरुणी एकटी असल्याचा फायदा उचलत त्याने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला होता. मोहम्मद अली अन्वर अन्सारी ऊर्फ बादशाह याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पीडित तरुणीनेही त्याला ओळखले असून त्यानेही आपल्या कृत्याची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे बादशाहला २९ ऑक्टोबर रोजी अभिनेता दिनू मोरीया याच्या घरात झालेल्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून त्यावेळी १७ लाखांचा चोरलेला ऐवजदेखील जप्त करण्यात आला होता. परंतु तो लगेचच जामीनावर सुटला होता. बादशाह याच्यावर भायखळा, वांद्रे आणि खार पोलीस ठाण्यात तब्बल २२ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे पोलीस अधिकारी उघडपणे बोलायला तयार नव्हते. स्पॅनिश तरुणीच्या बलात्कारप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद अन्वर अन्सारी ऊर्फ बादशाह (३०) याला रे रोड येथून अटक करण्यात आली. त्याच्या नावावर एकूण ३५ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी त्याने आणखीही दोन घरात चोरी केल्याचे उघडकीस आले असून  पोलिसांनी पुर्वीच त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर सोमवारची घटना घडली नसती.         

'राम' तिच्या मदतीला धावलाच नाही..
मध्यरात्री सव्वातीन वाजता जेव्हा खिडकीतून चोर तिच्या घरात शिरला तेव्हा त्याच्या हातात चाकू पाहून ती परदेशी तरुणी भेदरली. त्या अवस्थेतही तिने इंटरकॉमवरून इमारतीच्या वॉचमनला फोन केला. राम आणि लल्लन नावाचे दोन वॉचमन त्यावेळी रात्रपाळीला होते. परंतु ते गाढ झोपेत होते. इंटरकॉमवर तिने मदतीसाठी वारंवार फोन केले. परंतु झोपलेला ‘राम’ नावाचा वॉचमन तिच्या मदतीला काही आला नाही. हे दोन्ही वॉचमन डय़ुटीच्या वेळी गाढ झोपले होते, असे पोलिसांनी सांगितले. ते झोपेत असल्यानेच आरोपी घरात प्रवेश करू शकला.

सुरक्षा रक्षक झोपलेलेच!
ज्यांच्या हाती मुंबईकर सुरक्षा सोपवून बिनधास्त झोपतात ते सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळी झोपलेले असतात, असे आढळून आले आहे. पोलिसांनी दादर, माहीम आदी भागात झोपलेल्या सुरक्षारक्षकांविरोधात मोहीम उघडल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शंभरहून अधिक सुरक्षा रक्षक झोपलेले आढळले. रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक झोपलेले असल्याने गुन्हे घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिमंडळ ५ ने आपल्या क्षेत्रातील झोपलेल्या सुरक्षा रक्षकांविरोधात मोहीम उघडली होती. गेल्या चार दिवसांपासून ही मोहीम सुरू झाल्यानंतर शंभरहून अधिक सुरक्षा रक्षक झोपलेले आढळले. या झोपाळू रक्षकांच्या एजन्सीना त्याबाबत कळवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.