मुंबईतील मोकळ्या जागांच्या वापराचे धोरण लवकरच Print

खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील मोकळ्या जागांचा व्यापक आणि एकात्मिक आराखडा तयार करून त्यांच्या वापराबाबतचे धोरण ठरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे धोरण ठरविण्यासाठी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यांना तीन महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
 शहरातील मोकळ्या जागांच्या वापराबाबत सध्या कोणतेच धोरण नाही. त्यामुळे या जागांवर अतिक्रमणे होणे, त्याचा गैरवापर होणे आदी प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याबाबत न्यायालयानेही अनेकवेळा राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
या पाश्र्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील सर्व मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करून, केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण तसेच न्यायालयांचे आदेश यांचा अभ्यास करून मोकळ्या जागांचे धोरण ठरविण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीत एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, एमएसआरडीसी, एमआयडीसी आदी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी तसेच वास्तुविशारद प्रणब किशोर दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.