वृद्धेच्या हत्येप्रकरणी माजी नोकराला अटक Print

प्रतिनिधी, मुंबई
मालाडच्या निर्मला व्होरा (७८) या वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने व्होरा यांच्या दुकानातील पूर्वीचा नोकर पप्पू उर्फ गिरवरसिंग देवडा (२०) याला उदयपूर येथून अटक केली आहे. कामावरून काढून टाकल्याचा राग आणि पैशांची निकड यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालाड एसव्ही रोड येथील नेमाणी चाळीत राहणाऱ्या निर्मला व्होरा यांची रविवारी चाकूचे वार करून हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्याने घरातून ३५ तोळे सोन्यासह रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिट ११ ने याप्रकरणी व्होरा यांच्या उसाच्या दुकानात पूर्वी काम करणारा नोकर गिरवसिंग देवडा याला राजस्थानातील उदयपूर येथून अटक केली. त्याने २२ दिवस व्होरा यांच्या उसाच्या दुकानात काम केले होते. परंतु निर्मला व्होरा यांची मुलगी चेतना हिने त्याला कमी पैसे देऊन कामावरून काढून टाकले होते. तो राग त्याच्या मनात होता. त्याचवेळी चेतना यांची वृद्ध आई घरात दिवसा एकटीच असते आणि त्यांच्याकडे भरपूर पैसे आणि दागिने आहेत, हे त्याला समजले होते. त्यामुळेच त्याने ही योजना बनवली होती. रविवारी संध्याकाळी त्यांच्या घरात घुसून चाकूने वार करून त्याने निर्मला यांची हत्या केली. या नंतर तो राजस्थानला पळून गेला होता. युनिट ११ ने याप्रकरणी कसून तपास करून त्याला अटक केली आहे.
अपमानाचा बदला घ्यायचा होता आणि पैशांची गरज होती म्हणून हे कृत्य केल्याची कबुली दिल्याचे युनिट ११ चे पोलीस निरीक्षक रघुनाथ दळवी यांनी सांगितले. मुंबईत वर्षभरात १४ ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या झाल्या असून त्यापैकी १२ खुनांचा तपास लागला असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी दिली.