बेस्ट कर्मचाऱ्यांची आंदोलनापासून तूर्त माघार Print

प्रतिनिधी, मुंबई
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा तिढा अद्याप कायम असला तरी महापौरांच्या मध्यस्थीमुळे कामगार संघटनांनी तूर्तास आंदोलनापासून माघार घेत ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी भूमिका घेतली आहे. मात्र गुरुवारच्या बैठकीनंतर बोनस की आंदोलन हे स्पष्ट होईल.
महापालिकेप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांनाही दिवाळीनिमित्त १२,१०० रुपये बोनस मिळावा, अशी मागणी बेस्ट वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार सेनेने केली आहे. मात्र कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी जेमतेम पैशांची जुळवाजुळव झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना १२,१०० रुपये बोनस देण्यास बेस्ट प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे कामगार संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी महापौर सुनील प्रभू यांच्या दालनात कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. बैठकीस बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शरद राव, तर बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत व सुनील गणाचार्य उपस्थित होते. या संदर्भात सुनील प्रभू यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र बोनस प्रश्नावर तोडगा निघू शकला नाही. आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरू नये, अशी विनंती महापौरांनी अखेर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना केली. या विनंतीला मान देऊन कामगार संघटनांनी तूर्तास आंदोलनाचा मार्ग रहीत केला.  बोनस प्रश्नावर गुरुवारी दुपारी २.३० वाजता महापौरांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.