ठाणे, मुंबईत १७ लाखांचा बनावट मावा हस्तगत Print

प्रतिनिधी, ठाणे

दिवाळी तोंडावर येऊन ठेपली असतानाच मिठाई तयार करण्यासाठी मुदत संपलेला तसेच विविध घातक रंगांचे मिश्रण करून स्पेशल बर्फीच्या नावाने माव्याची विक्री करणाऱ्या पाच दुकानांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापे टाकले असून सुमारे ११ लाख ९४ हजारांचा मावा जप्त केला आहे.दिवाळीकरिता मिठाई तयार करण्यासाठी भेसळयुक्त, मुदत संपलेल्या तसेच खराब माव्याचा वापर करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार ठाणे, मीरा रोड, कल्याण, भाईंदर, कुंभारवाडा या भागांत अशा प्रकारच्या माव्याची विक्री करणाऱ्या दुकानांवर पथकाने छापे टाकले. यामध्ये कल्याण येथील मे. राजपूत आणि मे. पप्पू मावावाला, भाईंदर येथील मे. ए. के. मावावाला, ठाण्यातील मे. विपुल मावा सव्‍‌र्हिस आणि मीरा रोड येथील मनीष हरिभाई थोमर या दुकानांचा समावेश आहे. या धाडीत पथकाने राधे प्रीमियम आणि कृष्णा डेरी या कंपन्यांचा ११ लाख ९४ हजारांचा स्पेशल बर्फीचा मावा तसेच खवा जप्त केला असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी एस. के. शेरे आणि प्र. मा. राऊत यांनी दिली.  

प्रतिनिधी, मुंबई
अन्न व औषध प्रशासन आणि गुन्हे नियंत्रण शाखा यांनी मुंबईत विविध ठिकाणी छापे घालून सहा लाख रुपये किंमतीचा बनावट मावा जप्त केला. ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईकरांना निकृष्ट आणि बनावट मावा विकण्यात येत होता.
अन्न व औषध प्रशासनाने मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि कुर्ला स्थानकात छापे घालून बनावट आणि निकृष्ट दर्जाचा मावा हस्तगत केला. वांद्रे येथे सात व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे घालून ८९३ किलो मावा हस्तगत करण्यात आला तर मुंबई सेंट्रल स्थानकात ६९२ किलो मावा हस्तगत झाला. कुर्ला येथे गुन्हे नियंत्रण शाखेच्या पथकाने छापा घालून १८९० किलो मावा हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली. या माव्याचे नमुने तपासणीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. गुजरातमधून हा मावा मुंबईत विक्रीसाठी आणला गेला होता. त्याच्या वेष्टणावर कधी बनवला याची तारीख नव्हती, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.    

अन्न विक्रेत्यांना आवाहन
ठाणे जिल्ह्य़ातील अन्न व्यावसायिकांना परवाना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांचा वार्षिक व्यवसाय १२ लाखांपेक्षा कमी आहे त्यांनी नोंदणी करणे तर १२ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना परवाना घेणे बंधनकारक आहे.