बलात्कार करणाऱ्या बादशाहला स्पॅनिश तरुणीने ओळखले Print

प्रतिनिधी, मुंबई
घरात घुसून बलात्कार करणाऱ्या मोहम्मद बादशाह मोहम्मद इस्माईल अन्सारी उर्फ बादशाह याला स्पॅनिश तरुणीने ओळखले आहे. गुरुवारी आर्थर रोड कारागृहात ही ओळख परेड घेण्यात आली. त्यावेळी या तरुणीने चौघांमधून आरोपी बादशाह याला ओळखले सोमवारी मध्यरात्री वांद्रे येथील पेरी क्रॉस रोड येथे राहणाऱ्या २७ वर्षीय स्पॅनिश तरुणीच्या घरात घुसून बादशाह याने तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी त्याला मंगळवारी अटक करण्यात आली होती. फिर्यादी तरुणी तिच्या मायदेशात परतण्यापूर्वी ओळख परेड व्हावी, यासाठी पोलिसांनी बादशाह याची न्यायालयीन कोठडी मागितली होती. त्यानुसार गुरुवारी आर्थर रोड न्यायालयात ही ओळख परेड घेण्यात आली. दंडाधिकाऱ्यासमक्ष झालेल्या या ओळख परेडमध्ये पोलिसांनी बादशाहसारखे दिसणारे चारजण उभे केले होते. परंतु स्पॅनिश तरुणीने त्यातून बादशाह याला नेमके ओळखून काढल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी बादशाहचे डीएनए नमुने ताब्यात घेतले आहेत. तसेच या तरुणीच्या घरातील दोन चादरी, टॉवेल, सिगारेटची थोटके तसेच इतर गोष्टीही ताब्यात घेतल्या आहेत. बादशाहने आपल्यावरील आरोपांचा आधीच इन्कार केला आहे. डीएनए चाचणीमुळे त्याच्यावरील आरोप अधिक भक्कम होऊ शकतील, असे पोलिसांनी सांगितले.