सुनेला पेटविणाऱ्या वृद्ध सासवांची आयुष्याची संध्याकाळ तुरुंगातच Print

शिक्षेत सूट देण्यास राज्यपालांचा नकार
प्रतिनिधी, मुंबई
सुनेच्या हत्येप्रकरणी शिक्षा झालेल्या अनुक्रमे ८० व ९० वर्षांच्या दोन सासवांनी वयोमान विचारात घेऊन शिक्षेत सवलत देण्याची आणि मुदतपूर्व सुटका करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली होती. न्यायालयानेही त्यांच्या विनंतीची दखल घेत राज्य सरकारला त्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु राज्यपालांनी दोघींचे अर्ज फेटाळून लावल्याची माहिती सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आल्याने दोघींनाही आता आयुष्याची संध्याकाळ नातवंडे वा नातेवाईकांऐवजी तुरुंगातच घालवावी लागणार आहे.   
हौसाबाई कोळी (८०) व चंपा कांबळे (९०) या दोघींनी लिहिलेल्या पत्रांची दखल घेत न्यायालयाने सरकारला तात्काळ त्याच्यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली असता दोघींचे अर्ज राज्यपालांनी फेटाळले असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. सुनेचा हुंडय़ासाठी छळ करून तिची हत्या करणाऱ्या हौसाबाई यांनी १७ वर्षे शिक्षा भोगली आहे. मात्र आजारपणाचे कारण देत मुलगी व नातवंडांसोबत आयुष्याचे शेवटचे काही दिवस घालविण्याची इच्छा त्यांनी पत्रात नमूद केली आहे. कोल्हापूर तुरुंगाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे आजारपणाचे प्रमाणपत्रही त्यांनी पत्रासोबत जोडले आहे.  वय लक्षात घेता हौसाबाई फार काळ जगणार नाहीत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही मत आहे. तर चंपा कांबळे यांनीही आयुष्याची संध्याकाळ मुले-नातेवाईकांसोबत घालविण्याची इच्छा पत्राद्वारे न्यायालयात व्यक्त केली होती.