टीव्हीच्या आवाजावरून भांडणात एकाची हत्या Print

प्रतिनिधी, मुंबई
टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून झालेल्या भांडणातून  नालासोपाऱ्यात एकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.नालासोपारा पूर्व येथील आचोळे डोंगरी येथील भीमनगरात बुधवारी  हरिलाल दीपचंद जयस्वाल (३२) यांचा शेजारी रामप्रवेश ठाकूर यांच्या घरात टीव्हीचा आवाज मोठा होता. तो कमी करावा यासाठी हरिलाल यांची पत्नी ठाकूर यांच्या घरी गेली होती. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले. रात्री हरिलाल घरी आल्यावर पत्नी मंथा हिने झालेला प्रकार सांगितला. त्यावरून उभय शेजाऱ्यांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी रामप्रवेशने आपल्या दहा साथीदारांना बोलावून हरिलाल यांना लाठय़ाकाठय़ांनी मारहाण केली. त्यात हरिलाल यांचा जागीच मृत्यू ओढवला.