‘बेस्ट’चा बोनस दिवाळीनंतरच? Print

प्रतिनिधी, मुंबई
आर्थिक स्थिती नाजूक असतानाही बेस्ट प्रशासनाने बोनसबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून महापौरांच्या मध्यस्थीमुळे कामगार संघटनांनी आंदोलनाच्या भूमिकेपासून माघार घेतली आहे. मात्र कर्मचाऱ्यांना बोनस नेमका किती आणि केव्हा मिळणार हे गुलदस्त्यातच आहे. एकंदर परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतरच बोनस मिळण्याची शक्यता आहे. मात्र थकलेले वेतन पदरात पडल्याचे समाधान कर्मचाऱ्यांना मिळाले आहे.
गुरुवारी दुपारी पुन्हा कामगार संघटना, बेस्ट प्रशासन, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे वेतन गुरुवारी दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कामगार संघटनांनी माघार घेत आंदोलन रहीत केले. बेस्ट कर्मचाऱ्यांना  १२,१०० रुपये बोनस हवा आहे.