यूटय़ूबवर अपलोड होतात, मिनिटाला ७२ तासांचे व्हिडिओ! Print

प्रतिनिधी, मुंबई
जगभरात दर मिनिटाला यूटय़ूबवर तब्बल ७२ तासांचे व्हिडिओ अपलोड होतात. संपूर्ण भारतभरातून तयार होणारे व्हिडिओ आकडेवारीच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून भारत हा यूटय़ूबच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे, गुगल इन्कॉर्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष व मुख्य व्यवसाय अधिकारी निकेश अरोरा यांनी गुरुवारी येथे ही माहिती दिली.
यूटय़ूब आणि परराष्ट्र मंत्रालयाने ‘इंडिया इज.. अ व्हिज्युअल जर्नी’ या पाच मिनिटांच्या जागतिक लघुपट  स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात अरोरा बोलत होते. ते म्हणाले की, भारतीय कंपन्यांचा यूटय़ूबच्या उपक्रमात उत्तम सहभाग आहे. राजश्री प्रॉडक्शन्सच्या व्हिडिओंना चांगली मागणी आहे. तर सुमारे १८ महिन्यांपूर्वी आलेली टी-सिरीज ही आशिया खंडातून सर्वाधिक महसूल देणारी कंपनी ठरली आहे. येणाऱ्या काळात भारत व्हिडिओ निर्मितीत जगभरात आघाडीवर असेल, हेच यातून लक्षात येते. परराष्ट्र सहसचिव रिवा गांगुली दास म्हणाल्या की, सरकारी खाती नेहमीच अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरात मागे असतात. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने हा समज मोडीत काढला आहे. गेल्या वर्षी प्रथमच ही स्पर्धा आयोजिण्यात आली होती. त्याचवेळेस डिजिटल माध्यमाचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे यंदा थेट यूटय़ूबला सोबत घेऊन स्पर्धा आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चित्रपट निर्मितीसाठी इच्छुक असलेले, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजिण्यात आल्याचे गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी सांगितले.    
इंडिया इज.. इ व्हिज्युअल जर्नी !
इंडिया इज इन्क्रेडिबल, इंडिया इज अनफर्गेटेबल आणि इंडिया इज व्हेअर यू आर असे तीन विषय या स्पर्धेसाठी आहेत. पाच मिनिटांचे लघुपट तयार करून ते यूटय़ूबवरच अपलोड करायचे आहेत. सर्वोत्तम लघुपटाच्या दिग्दर्शकास आपल्या चित्रपटातील एक प्रसंग दिग्दर्शित करण्याची संधी मिळेल, असे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी याप्रसंगी सांगितले.