अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी फरार Print

प्रतिनिधी , वसई
भाईंदरमधील उत्तन येथे ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एका विवाहित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी फरार झाला आहे.पीओपीचे काम करणारा आरोपी अब्दुल शेख (२८)हा उत्तनच्या शांतीनगर डोंगरी भागात राहणाऱ्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता. ६ नोव्हेंबरला तो वसईत कामासाठी जात असता पीडित मुलीच्या अपंग आईने तिच्याजवळ पैसे देऊन अब्दुलसोबत बाजारातून सामान खरेदी करण्यासाठी पाठविले. मात्र अब्दुलने तिला बाजारात न नेता घरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला.
 घरी आल्यानंतर मुलीने याबाबत आईला सांगितले. याप्रकरणी अब्दुलविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेनंतर अब्दुल फरार झाला आहे.
पोटच्या मुलीवर बलात्कार
नालासोपारा पूर्व येथील एक रहिवासी अभिजीत दास नावाच्या इसमाला पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. खार (मुंबई) येथील एका शाळेत संगीत शिक्षक असलेला अभिजीतने पत्नीला व १७ वर्षे वयाच्या मुलीला घराबाहेर हाकलून देईन, अशी धमकी देऊन बलात्कार केला. दोनदा हा प्रकार घडल्यामुळे दासच्या पत्नीने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.