कल्याणमध्ये सरपंच, उपसरपंचाला लाच घेताना अटक Print

प्रतिनिधी, कल्याण
कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला काळे व उपसरपंच रवींद्र बासरे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका हॉटेल व्यावसायिकाकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी रात्री रंगेहाथ अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नीलेश जाधव यांचे गोवेलीजवळ हॉटेल आहे. दिवाळीनिमित्त शुभेच्छा फलक लावण्यासाठी जाधव यांनी सरपंच, उपसरपंच आणि लिपिकाकडे ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र फलक लावण्यासाठी या तिघांनी जाधव यांच्याकडे ३० हजारांची मागणी केली होती. तडजोडीने ही रक्कम १५ हजार रुपयांवर आणून देण्याचे निश्चित झाले. तत्पूर्वी जाधव यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीनुसार बुधवारी रात्री सरपंच काळे यांच्या घरी ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले. तर लिपिक चोरगे या वेळी पळून गेला. टिटवाळा पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.