एक दिवसाचे बाळ चोरीला गेलेल्या पित्याचा असहाय्य आक्रोश.. Print

प्रतिनिधी, मुंबई
पत्नी बाळंत होणार म्हणून देवदास नाईक दुबईमधील घसघशीत पगाराची नोकरी सोडून मुंबईत दाखल झाले. पण स्वप्नांची नगरी मुंबईत त्यांचे एक दिवसाचे मूल रुग्णालयातून चोरीला गेले आणि सुखी संसाराचे त्यांचे स्वप्न चक्काचूर झाले. आपले मूल परत मिळवण्यासाठी नाईक यांनी रुग्णालयाच्या बाहेर मुक्काम ठोकला असून आता त्या बाळाची माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
देवदास नाईक यांच्या पत्नी जस्मीन नाईक यांना बाळंतपणासाठी वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता बायको आणि मूल यांच्यासह राहायचे, असे सुखी संसाराचे स्वप्न रंगवत दुबईतील नोकरी सोडून देवदास मुंबईत आले. पण जस्मीन यांच्या बाळंतपणाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे बाळ पळवले गेले. आपले मूल चोरीला गेल्याचा मानसिक धक्का जस्मीन यांना बसला आहे. तर आपल्या मुलाबाबत काहीतरी सुगावा लागेल या आशेने देवदासही रुग्णालयाबाहेर बाकडय़ावर दिवसभर बसून असतात. मूल पळवले जाणे हे मोठे दुस्वप्न ठरले आहे. मोठय़ा रुग्णालयांमध्येही सुरक्षा व्यवस्थेकडे कसे दुर्लक्ष होते याचे हे उदाहरण आहे, असे देवदास सांगतात.
दुर्दैवाने रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने मूल कोणी चोरले हे समजू शकले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासातही फारशी प्रगती दिसत नसल्याने आता देवदास यांनी चोरीला गेलेल्या बाळाबाबत माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी पत्रके वाटण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे. कोणाकडून तरी आपल्या तान्हुल्याचा पत्ता लागेल या आशेवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.