भांडवली कराविरोधात आयुक्तही मुख्यमंत्र्यांना भेटणार Print

प्रतिनिधी, ठाणे
भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेना नगरसेविकांच्या ठिय्या आंदोलनाचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत उमटले. या घटनेचा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी निषेध केल्याने शिवसेनेचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले. नवी करप्रणाली लागू करण्यासाठी आग्रही नसल्याचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी स्पष्ट करताच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला. तसेच राजीव यांच्या भूमिकेनंतर नवी करप्रणाली लागू करू नये या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, असा निर्णय सर्वपक्षीय सदस्यांनी एकमुखाने घेतला.
ठाणे महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली लागू करू नये, असा निर्णय सर्वपक्षीय सदस्यांनी महासभेत घेतला होता. यासंबंधी ठरावही करण्यात आला. मात्र हा ठराव विखंडित करण्यासंदर्भात आयुक्त राजीव यांनी सरकारला पत्र पाठविले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नव्या वादाला तोंड फुटले होते. प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी माहिती जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्या कार्यालयात शिवसेना नगरसेविकांनी ठिय्या आंदोलन केले होते. शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी या घटनेचा निषेध करतानाच नव्या करप्रणालीलाही विरोध दर्शविला. त्यामुळे शिवसेनेचे सदस्य आक्रमक होऊन खडाजंगी झाली. त्याच वेळी शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी आयुक्तांनी सरकारला दिलेल्या पत्राचे वाचन करण्यास सांगितले. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण होते. त्यानंतर दोन्ही सदस्यांनी नव्या करप्रणालीविषयी प्रशासनाची नेमकी भूमिका विचारली. यासंदर्भात मालमत्ता कर विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. त्याचाच आधार घेत शिवसेनेच्या सदस्यांनी प्रशासनाला तसेच राष्ट्रवादीच्या सदस्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी सभागृहात आलेल्या आयुक्त राजीव यांनी नव्या करप्रणालीविषयी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. तसेच ही प्रणाली लागू करण्यासाठी आग्रही नसल्याचे सांगत या संदर्भात लोकप्रतिनिधींसोबत शासन दरबारी जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली.