रेल्वे अपघातातील तरुणांच्या मृतदेहांची अदलाबदल Print

खास प्रतिनिधी, नवी मुंबई
सारसोळे येथील रेल्वेरुळ ओलांडताना गुरुवारी मृत्यू पावलेल्या तीन महाविद्यालयीन युवकांपैकी दोन तरुणांचे मृतदेह ताब्यात देताना शुक्रवारी त्यांची अदलाबदल झाली. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. पालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे उघड झाले आहे.
गुरुवारी दुपारी राहुल बोडके, राकेश पोटे आणि संतोष मालेकर या तरुणांचा सारसोळे येथील रेल्वेरूळ ओलांडताना उपनगरी रेल्वेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाला. पहाटे उशिरा त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सकाळी राहुल आणि राकेश यांच्या मृतदेहामध्ये अदलाबदल झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वाशी पालिका रुग्णालयात काही काळ गोंधळ घातला.
पोलीस आणि पालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या नातेवाईकांनी मुलांच्या मृतदेहावर अंत्यसस्कार केले. या तरुणांच्या मृत्यूबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.