वादळाला थोपविणारी छत्री तयार! Print

पी.टी.आय., लंडन
गडगडाटी पावसासोबत झुंजणाऱ्या वाऱ्याशी लढाईत पराभूत झालेल्या छत्रीच्या नाजुकतेला लाखोली वाहण्याची गरज आता उरलेली नाही.  ताशी ११३ कि.मी वेगाने वाहणाऱ्या वादळातही ‘स्थितप्रज्ञ’ राहू शकणारी आणि आपल्या मालकाला विजयी मुद्रेने वाऱ्याला चिडविण्याची संधी देणारी  ‘वादळरोधक’ छत्री तयार करण्यात आली आहे.  
पारंपरिक छत्र्या मजबुती आणि आकर्षकपणाचा कितीही दावा करीत असली, तरी त्यांची क्षमता ताशी २० कि.मी वाऱ्याला सहन करण्यापुरती मर्यादित असते. मात्र नव्या ‘सायकल हॅल्मेट’सारखी छत्री त्याहून किमान १०० कि.मी वेगाने वाहणाऱ्या वादळातही गतप्राण किंवा उलटी होत नाही. या छत्रीची रचना कुठल्याही प्रकारच्या वादळाला थोपविण्यास सज्ज असल्याचा दावा, त्याच्या निर्मात्यांनी केला असल्याचे ‘डेली मेल’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.  ही छत्री वापरकर्त्यांला  पावसापासून वाचवेलच, पण त्यासोबत कितीही घोंघावणाऱ्या वादळामध्ये स्थिर राहील.
डच अभ्यासकांनी एका बोगद्यामध्ये पारंपरिक छत्रीच्या वादळाशी झुंजण्याच्या क्षमतेचा अभ्यास केला. त्यानंतर विशिष्ट आकार दिल्यामुळे तिची वादळाशी लढण्याची क्षमता वाढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जेरविन हुगेण्ड्रोन या अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांने या ‘सेंझ अम्ब्रेला’ची आठवडय़ाभरामध्ये आखणी केली.  आपल्या आजीच्या शिलाई मशीनवर या छत्रीचे उत्पादन सुरू केले. त्याने आपल्या विद्यापीठातील दोन मित्रांना सोबत घेऊन या सेंझ अम्ब्रेलाची जागतिक बाजारपेठेत विक्रीही सुरू केली आहे. सध्या ही छत्री ३३ अमेरिकी डॉलर  (१५००  ते १८०० रुपये) या किंमतीत उपलब्ध आहे. या छत्रीकर्त्यांच्या संकेतस्थळावरूनही छत्री खरेदी करता येऊ शकते.