नीतिशना हवा राष्ट्रपतींचा आशीर्वाद! Print

alt

पीटीआय, पाटणा
बिहारची भरभराट होण्यासाठी आपल्या आशीर्वादांची गरज आहे, असे भावनिक आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना केले. बिहारच्या पंचवार्षिक कृषी आराखडय़ाचे अनावरण मुखर्जी यांच्या हस्ते येथे झाले, त्यावेळी नीतिशकुमार बोलत होते.
अनेक वर्षे मागासलेल्या बिहारला आता प्रगतीची आस लागली असून ते विकसीत राज्य म्हणून उदयास यावे, असे आम्हा सर्वाचेच स्वप्न आहे. यासाठी बिहारला विशेष दर्जा मिळण्याची आवश्यकता असून त्यासाठी आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर बिहारचा दौरा करण्याचे आश्वासन आपण दिले होते, हे आश्वासन आठवणीने पाळल्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत, सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक साध्यर्मे असल्याने प. बंगाल आणि बिहारमध्ये वेगळेच भावनिक नाते आहे, असे त्यांनी नमूद केले.
बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकत नीतिशकुमार यांनी गेल्या महिन्यापासून ‘अधिकार यात्रा’ सुरू केली आहे.