अन्नाच्या नासाडीची संयुक्त राष्ट्रांना चिंता Print

पीटीआय , हैदराबाद

जेवताना ताटात अन्न उरवू नये.. लागेल तेवढंच ताटात वाढून घ्यावे.. अन्न वाया घालवू नये.. ही शिकवण प्रत्येकाला घराघरातून दिली जाते. मात्र, तरीही दरवर्षी जगभरात ३० टक्के अन्न वाया जाते आणि आता ती एक जागतिक समस्या बनली आहे. अन्न वाया जाऊ नये यासाठी विकसित आणि विकसनशील देशांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे बनले असल्याचा सूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत व्यक्त करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण उपक्रमांतर्गत (यूएनईपी) येथे जैविक वैविध्यावर पक्षांची परिषद (सीओपीसीबीडी) भरली आहे. त्यात दरवर्षी जगभरात वाया जात असलेल्या अन्नाच्या प्रमाणाविषयी चिंता तर व्यक्त करण्यात आलीच शिवाय त्यावर काय उपाय करता येतील यावरही चर्चा झाली.
विकसनशील देशांपेक्षा विकसित राष्ट्रांमध्ये अन्न वाया जाण्याचे प्रमाण अंमळ अधिक असले तरी या मुद्दय़ाकडे आम्ही एक जागतिक समस्या म्हणूनच पाहतो असे यूएनईपीच्या कार्यकारी संचालिका व संयुक्त राष्ट्रांच्या उप सरचिटणीस अमिना मोहम्मद यांनी स्पष्ट केले. अन्न वाया घालवण्याच्या समस्येकडे सर्व देशांच्या सरकारांनी लक्ष घालून त्यावर उपाययोजना कराव्यात याचा आग्रह आम्ही धरला असून जनजागरण मोहिमाही आम्ही या मुद्दय़ावर सुरू केल्याचे मोहम्मद यांनी सांगितले.
ज्या देशांमध्ये साठवणुकीच्या क्षमता कमी आहेत, ज्यांच्याकडे साठवणुकीचे तंत्रज्ञान नाही किंवा ज्यांच्याकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही अशा देशांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारीही यूएनईपीने दाखवली असल्याचे मोहम्मद म्हणाल्या.
धक्कादायक अहवाल
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) अलीकडेच तयार केलेल्या अहवालात जगभरात जेवढे अन्नधान्य उत्पादन केले जाते, त्याच्या एक तृतियांश अन्नधान्य वापराविना फेकले जाते किंवा नाश पावते असे स्पष्ट करण्यात आले आहे. विकसित देशांमध्ये ६८ कोटी डॉलर किंमतीचे तर विकसनशील देशांमध्ये ३१ कोटी डॉलर किंमतीचे अन्नधान्य वाया जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे.     
एक अब्ज नव्हे
 ८७ कोटी..
जगभरात एक अब्ज जनता भुकेली राहते अशा आशयाचे विधान करत संयुक्त राष्ट्रांनी तीन वर्षांपूर्वी खळबळ उडवून दिली होती. मात्र, ही संख्या एक अब्ज नसून ८७ कोटी असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे आता म्हणणे आहे. चुकीच्या गणितीय पद्धतीमुळे हा घोळ झाल्याचे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे.