ग्रामीण गरिबांना स्वस्तात गॅस आवश्यक - पंतप्रधान Print

पीटीआय, नवी दिल्ली

देशात प्रत्येक घरात स्वयंपाकाचा गॅस आणि वीज पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगतानाच ग्रामीण भागातील गरिबांना स्वस्तात या गोष्टी पुरवणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी केले. अर्थात स्वयंपाकाच्या गॅसचे जाळे गावोगावी पोहोचवण्यासाठी काही कालावधी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ऊर्जा वापराबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी प्रत्येक घरात स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन पोहोचविण्याचे काम कठीण असले तरी अशक्य नाही, असे सांगितले. ग्रामीण भागातील गरिबांना वीज आणि गॅस या दोन्ही गोष्टी परवडणाऱ्या दरात मिळाव्यात यासाठी कमाल अनुदान देण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. ‘ग्रामीण भागातील १९ कोटी कुटुंबांपैकी अवघ्या १२ टक्के घरांत स्वयंपाकाचा गॅस जातो. देशभरातील २४ कोटी घरांत दरवर्षांला सहा याप्रमाणे सिलिंडर पुरवण्यासाठी अंदाजे अडीच कोटी टन एलपीजी गॅसची गरज आहे. हे आपल्याला शक्य आहे,’ असे ते म्हणाले.
पुढील पाच वर्षांत देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवणे हे सरकारचे ध्येय आहे, असेही त्यांनी सांगितले.