कुपोषणमुक्ती ही सामाजिक जबाबदारी ! Print

भाजपाशासित राज्यांना गडकरींचा मंत्र
मनोज जोशी , चातगाव (जि. गडचिरोली)
कुपोषित माता आणि मुले यांचा जीव वाचवणे ही आमची सामाजिक जबाबदारी असून, भाजपशासित राज्यातील आरोग्य मंत्र्यांनी हे काम संवेदनशील मनाने ‘मिशन’ म्हणून स्वीकारावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले.
‘कुपोषण आणि बालमृत्यू’ या विषयावर भाजपशासित राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक गडचिरोलीनजिकच्या चातगाव येथील ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्राम संस्थेत पार पडली. या बैठकीच्या समारोपप्रसंगी गडकरी बोलत होते.
शिक्षण, सामाजिक व आरोग्यदृष्टय़ा वंचित व्यक्तीला विकासाची संधी देणे, म्हणजे ‘अंत्योदय’च्या संकल्पनेला आम्ही बांधील आहोत. या दृष्टीने विशेषत: मागासलेल्या भागातील परिस्थती चांगली नसून ती बदलणे हे आमच्यासाठी आव्हान आहे. या बैठकीत सहभागी झालेले मंत्री आपापल्या राज्यात जाऊन येथील ठरावांची अंमलबजावणी करतील, अशी आशा गडकरी यांनी व्यक्त  केली.