दिल्ली- मुंबई शहरांनी गाठला समृद्धीचा अर्धाच पल्ला! Print

alt

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील निष्कर्ष
पी.टी.आय., नवी दिल्ली
झगमगाटी देखणेपण आणि संपन्नतेच्या दृष्टीने जगातील ९५ प्रमुख महत्त्वाच्या शहरांमध्ये मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांची वर्णी लागली आहे. मात्र पायाभूत सुविधांचा अभाव आणि पर्यावरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे या भारतीय शहरांनी समृद्धीचा अर्धाच पल्ला गाठला असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी बुधवारी दिलेल्या अहवालात म्हटले आहे.  जगातील शहरांच्या प्रगती आलेखासंबंधाबाबत संयुक्त राष्ट्रांनी पाहणी अहवाल नुकताच सादर केला. शहराची उत्पादकता, तेथील नागरिकांच्या जगण्याची गुणवत्ता, पायाभूत सुविधा, पर्यावरण आदी निकषांवर ही पाहणी करण्यात आली.  या पाहणीत मुंबई आणि दिल्ली केवळ ढाका, काठमांडू आणि कम्पाला या शहरांहून वरचढ असल्याची बाब समोर आली आहे.  ९५ शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक ५२ वा तर दिल्लीचा क्रमांक ५८ वा आहे. चीनची शांघाय व बीजिंग या शहरांची वर्णी जगातील उत्तम शहरांमध्ये लागली आहे.  मुंबई आणि शहरांच्या समृद्धीत मूलभूत सुविधांचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेप यांचा मोठा अडसर असल्याने ही शहरे समृद्धीच्या केवळ अध्र्याच टप्प्याला गाठू शकली असल्याचे अहवालामध्ये  म्हटले  आहे.  या अहवालामध्ये बंगळुरू शहरामध्ये झालेल्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा आणि हैदराबाद शहराने औषधनिर्माण शास्त्रात घेतलेल्या झेपेचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

मुंबई आणि दिल्ली या दोन्ही भारतीय शहरांनी समृद्धीच्या अध्र्याच पल्ल्याला गाठले आहे.  शहराची समृद्धी ही केवळ आर्थिक निकषांवर मोजली जात नाही, त्या शहरात असलेल्या पायाभूत सुविधा व नागरिकांच्या जगण्याची गुणवत्ता या दोन गोष्टींना महत्त्व असते. दोन्ही शहरांमध्ये या गोष्टींची पर्याप्त पूर्तता होऊ शकलेली नाही. नवी दिल्लीमधील नागरिकांचे जीवनमान हे मुंबईहून कमी दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.
- एडवडरे लोपेझ मोरेनो,  संयुक्त राष्ट्रांच्या पाहणी अहवालाचे प्रमुख