भारताला अणू इंधन पुरवण्याची ऑस्ट्रेलियाची तयारी Print

पीटीआय

नवी दिल्ली
भारताला अणू इंधनाचा पुरवठा न करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या पारंपरिक धोरणात बदल करीत भारताला युरेनियमचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांच्या निर्णयाचे भारत सरकारने स्वागत केले आहे.
भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस.एम.कृष्णा यांनी या निर्णयाबद्दल गिलार्ड यांचे आभार मानले. भारताने अजूनही आण्विक प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाही, मात्र असे असूनही भारताला अणू इंधनाचा - युरेनियमचा पुरवठा करण्याची तयारी दाखविणे हा गिलार्ड यांचा अत्यंत धाडसी निर्णय असल्याचे कृष्णा यांनी सांगितले.
या चर्चेदरम्यान ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. तसेच अफगाणिस्तानातील सद्यस्थिती, टप्प्याटप्प्याने नाटो फौजांकडून घेतली जाणारी माघार आणि भविष्यातील आव्हाने या विषयांचा ऊहापोह करण्यात आला.
यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याशी द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा केली. यामध्ये उभय देशांमधील व्यापार, ऊर्जा, भारताच्या आर्थिक विकासात ऑस्ट्रेलियाचा सहभाग, शिक्षण अशा विविध मुद्दय़ांचा समावेश होता.