गोव्यातील बेकायदा खाणकामात दिगंबर कामत, प्रतापसिंह राणे सहभागी-पर्रिकर Print

पी.टी.आय. पणजी
गोव्यातील बेकायदा खाणकामांमध्ये काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि प्रतापसिंह राणे यांच्यासह काँग्रेसचेच प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर हे सहभागी असल्याची तोफ मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी येथे डागली. या ज्येष्ठ नेत्यांखेरीज राज्यातील काँग्रेसच्या अन्य नेत्यांचाही यामध्ये समावेश असल्याची टीका पर्रिकर यांनी केल्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.शहरातील पार्किंग टर्मिनसच्या पायाभरणी समारंभानंतर पर्रिकर पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील बेकायदा खाणींच्या उत्खननामध्ये कामत व राणे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते सामील असल्याची टीका त्यांनी केली. प्रतापसिंह राणे हे राज्याच्या खाणविभागाचे प्रमुख होते, याकडेही पर्रिकर यांनी लक्ष वेधले. राणे यांच्याखेरीज माजी नगरविकास मंत्री जोकीम अलेमाव हेही अवैध खाणकामांमध्ये सक्रिय होते, असा गौप्यस्फोट पर्रिकर यांनी केला.