‘भारत आमचा शत्रू नाही तर भागीदार’ Print

चीनने पुढे केला मैत्रीचा हात
पीटीआय, बीजिंग
भारत-चीन युद्धाच्या पन्नास वर्षांनंतर परिस्थिती खूपच बदलली आहे, भारत हा आमचा शत्रू नाही तर भागीदार आहे, भारताबरोबर धोरणात्मक सहकार्यावर आधारित भागीदारी करण्याचा आमचा निर्धार आहे, अशा शब्दांत आज चीनने  भारताला ‘मुझसे दोस्ती करोगे’ असाच संदेश दिला आहे. भारत-चीन युद्धाला ५० वर्षे झाल्यानंतर भारतात घेण्यात आलेला स्मृती कार्यक्रमाच्या निमित्ताने चीनने प्रथमच प्रतिसाद दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाँग लेई यांनी सांगितले, की भारत-चीन युद्धाच्या निमित्ताने भारतीय प्रसारमाध्यमांतून व्यक्त झालेली मते व दिल्लीत झालेला स्मृती कार्यक्रम यांची आम्ही दखल घेतली आहे.
गेल्या पन्नास वर्षांत जग खूप बदलले आहे. जास्त लोकसंख्या असलेले विकसनशील देश म्हणून चीन व भारत यांच्यापुढे विकासाच्या अनेक संधी आहेत. भारत हा आमचा शत्रू नाही तर भागीदार आहे. शत्रुत्वाऐवजी सहकार्यावर आधारित भागीदारी करण्याच्या समान उद्दिष्टापुढे भांडण, तंटे यांना काहीच महत्त्व नाही. चीन भारताबरोबर काम करण्यास तयार आहे, त्यासाठी विश्वास, संपर्क व सहकार्य वाढवण्याची आमची तयारी आहे. सहकार्यावर आधारित भागीदारीचे धोरण हे दोन्ही देशांना व तेथील जनतेला फायद्याचे आहे असे त्यांनी सांगितले.