रुग्णालयातील जुन्या मासिकांतून होऊ शकतो सूक्ष्म जंतूंचा फैलाव! Print

आजारपणातील वेळकाढू वाचन  करू शकते आणखी आजारांचे धनी
पीटीआय ,लंडन
alt

उपचार अथवा सल्ला घेण्यासाठी रुग्णालयात गर्दीमुळे आपला नंबर येईस्तोवर टिपॉयवर ठेवलेली चकचकीत जुनी मासिके हाताळण्यासाठी वेडे वाचक असण्याची गरज असावी लागत नाही. मात्र रुग्णकाळातील अल्पकाळाचे वाचनवेड किंवा वेळकाढू कुतूहल आणखी आजारांचे धनी करू शकते. कारण इतस्तत: पसरलेली हीच जुनी मासिके ही सूक्ष्म जंतूंमुळे निर्माण करणाऱ्या रोगांपेक्षा अधिक घातक ठरू शकतील, असे अभ्यासकांनी म्हटले असून त्यापासून दूर राहण्याचाच इशारा दिला आहे. डॉक्टर्सच्या क्लिनिकमधील मासिके ही जास्तीत जास्त आठवडाभरापर्यंतच वापरली जावीत. त्यानंतर ती सरळपणे फेकण्यात यावीत वा बदलली जावीत. मात्र रुग्णांकडून त्यांचा अधिक काळ वापर केला जाता कामा नये, असे ‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.        

काय सांगतात तज्ज्ञ?
ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थेने दक्षिण इंग्लंडमधील डोर्सेट परगण्यातील लाइम रेगिस या पश्चिम किनारपट्टीतील शहरात दवाखाना चालवणाऱ्या एका दंतशल्यचिकित्सकाला यासंबंधात इशारेवजा ताकीद दिली आहे. त्याच्या दवाखान्यात प्रतीक्षा कक्षातील मासिकांत  ब्लू-टॅक (घातक रसायनांनी युक्त अशी शाई) लावलेली पोस्टर्स आढळली. या ब्लू-टॅकचा पुनर्वापर हा घातक ठरू शकतो, असा दावा डोर्सेट प्रायमरी केअर ट्रस्टमधील तज्ज्ञांनी केला असून, याची तातडीने दखल घेण्याचा आदेश यामुळे संबंधित दंतवैद्याला देण्यात आला आहे. सदर दंतवैद्याने याची योग्य ती दखल न घेतल्यास सेवा सुरक्षा आयोगातर्फे त्याची तपासणी करण्यात येऊन त्याने चालढकल केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा गर्भित इशाराही त्याला देण्यात आला आहे.

कसे राहावे सुरक्षित?
प्रतीक्षा कक्षातील मासिके ही आठवडाभरापेक्षा अधिक काळ त्या ठिकाणी असता कामा नयेत. आठवडय़ाभरानंतर ती बदलण्यात यावीत अथवा फेकण्यात यावीत, अशी सर्वसाधारण आवश्यकता सेवा सुरक्षा आयोगाने व्यक्त केली असून त्यासाठी निश्चित कालावधीचा बडगा ठेवण्यात आला नसल्याचेही आयोगाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. प्रतीक्षा यादीत असलेल्या रुग्णांना तेथील मासिके चाळून काही काळ का होईना ते त्या ठिकाणी ज्या कारणासाठी जातात त्यापासून मुक्ती मिळते अथवा तेथील मासिकांतून त्यांची आरोग्यविषयक जाणीवही वृद्धिंगत केली जाते. अशा मासिकांच्या निर्मात्यांतही यामुळे स्पर्धा निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी ब्रिटनमध्ये स्वाइन फ्लूचा फैलाव झाल्यानंतर काही डॉक्टर्सनी आपल्या उपचार केंद्रांच्या प्रतीक्षा कक्षांतील मासिके बदलली होती, असेही यासंबंधीच्या वृत्तात म्हटले आहे.