बान की मूनही आता ‘अबलख’ घोडय़ावर Print

‘गंग्नम स्टाइल’ गाण्यावर केले नृत्य
पी.टी.आय. संयुक्त राष्ट्रे
alt

‘अबलख’ घोडय़ावर बसल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या दक्षिण कोरियाई ‘गंग्नम स्टाइल’ गाण्याने आधी कोरिया मग यू-टय़ूबवरून जग पादाक्रांत केले. त्यानंतर क्रीडाविश्व, हॉलीवूडपासूून बॉलिवूडच्या सेलिब्रेटी विश्वाला नादावले. आता आंतरराष्ट्रीय कायदा, सुव्यवस्था आणि मानवी हक्कांच्या रक्षणकर्त्यां समजल्या जाणाऱ्या संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमुख बान की मूून हेही आपल्या जन्मदेशातील या निर्मितीने उघडपणे भारावल्याचे समोर आले आहे. आपल्या आजवरच्या गंभीर प्रतिमेला जपणारे बान की मून सार्वजनिकरीत्या ‘गंग्नम स्टाइल’ थिरकताना समोर आले. कोरियन पॉप स्टार ‘साय’ याच्या लोकप्रियतेचा हेवा वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी असल्याची जाणीव मला हे नृत्य करण्यापासून रोखत होती, असेही त्यांनी सांगितले. नुकताच साय हा त्यांच्या कार्यालयामध्ये जागतिक प्रश्नांवर एकत्र काम करण्याबाबत चर्चा करण्यासाठी उपस्थित झाला होता. त्याची सध्याची जागतिक लोकप्रियता तो संयुक्त राष्ट्रांचा सदिच्छा दूत बनण्याचे संकेत देणारी आहे.       

काय आहे ‘गंग्नम स्टाईल’ जग?
आगामी टाइम मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ‘गंग्नम स्टाइल’ गीताच्या कर्त्यां पाक जाए-संग ऊर्फ साय याने आपले नाव राखून ठेवले आहे, इतकी त्याची जगभरातील लोकप्रियता अबाधित आहे. आपल्याकडे ‘ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कप’च्या निमित्ताने वेस्ट इंडिज संघाच्या नृत्यामुळे ‘गंग्नम स्टाइल’ अबालवृद्धांना परिचित झाली असली, तरी जुलै महिन्यापासून त्याचा व्हिडीओ यू टय़ूबवरच्या सर्वाधिक हिट्स असलेला आहे. सोलच्या उपनगरामधील उच्चभ्रूंमध्ये वाढत चाललेल्या उपभोगी संस्कृतीची खिल्ली उडविणारे हे कोरियाई भाषेतील गीत समजून घेण्यासाठी तिची भाषा माहीत असण्याची गरज वाटत नाही. हिप-हॉप, रॅप यांचे मिश्रण असलेले हे गीत त्याचे चित्रीकरण आणि नृत्यशैलीमुळे ‘युझर्स फ्रेंडली’ बनले. सर्व खंडांमध्ये या कोरियाई पॉपस्टारची कीर्ती पसरली. सर्व अमेरिका आणि युरोपमधील सेलिब्रेटी शोजमध्ये साय याची उपस्थिती महत्त्वपूर्ण बनली. यू टय़ूबवर केवळ या नावाचा सर्च दिल्यास जगभरातील क्रीडापटू आणि अभिनेत्यांना अबलख घोडय़ावरील या नृत्याचा मोह आवरता आलेला नाही, याची अनेक उदाहरणे सापडतील. तरुणांपासून वृद्घांपर्यंत ‘गंग्नम स्टाइल’ने केलेल्या जादूच्या नव्या उदाहरणात आता बान की मूनही सामील झाले आहेत.     

काय आहे के- पॉप जग?
alt
आंतरराष्ट्रीय संगीत जगतावर अलीकडच्या काही काळापर्यंत युरोप आणि अमेरिकी संगीताचे राज्य होते. मात्र त्यांची जागा आता कोरियाई आणि जपानी पॉपविश्व घेऊ पाहत आहे. गेल्या वर्षीच्या एम टीव्हीच्या आंतरराष्ट्रीय स्टाइल पुरस्कारांवर लेडी गागा वा कुठलेही अमेरिकी नाव नव्हते, तर सगळ्या पुरस्कारांचे मानकरी कोरियाई पॉप कलाकार ठरले होते. इतर कुठल्याही देशात नसेल, इतक्या कडक नियमांनी ‘टॅलेंट हंट’ शोज जपान आणि दक्षिण कोरियामध्ये घडत आहेत. हे दोन देश कलाकार आणि नवी ‘स्टाइल’ प्रसारित करणाऱ्या फॅक्टऱ्या बनू पाहत आहेत.  यू-टय़ूबच्या माध्यमातून जगात लोकप्रिय होणाऱ्या कोरियाई कलाकारांची यादी मोठी आहे. शाईनी, एफ (एक्स), सुपर ज्युनिअर, ईएक्सओ, टीव्हीएक्सओ हे के-पॉप स्टार आणि बँड्स ‘राष्ट्रीय आयडॉल’ तर आंतरराष्ट्रीय प्रभावक्षेत्रे बनली आहेत.