टॅबलेट किंगचा अल्पावतार आला! Print

अ‍ॅपलचा आयपॅड मिनी दिमाखदार, पण किंमत तुलनेने जास्तच
सॅन होजे , एएफपी ,२४ ऑक्टोबर २०१२
alt

अ‍ॅपलचा सर्वात छोटा आयपॅड अर्थात आयपॅड मिनी बुधवारी सादर करण्यात आला. अ‍ॅमेझॉन, गुगल व सॅमसंग यांच्या छोटय़ा टॅबलेटमधील मक्तेदारीला अ‍ॅपलने आयपॅड मिनीच्या माध्यमातून कडवे आव्हान दिले आहे. अ‍ॅपल कंपनीने कॅलिफोर्नियातील सॅन होजे  येथे झालेल्या कार्यक्रमात आयपॅड मिनीबरोबरच १३ इंचाचे मॅकबुक, स्लिम आयमॅक व मॅकमिनी ही उत्पादनेही सादर करण्यात आली. भारतात मात्र आयपॅड मिनी लगेच सादर केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांना उत्सुकता असेल त्यांना तो परदेशातून आणावा लागणार आहे.


अ‍ॅपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिल शिलर यांनी सॅन होजे येथील कार्यक्रमात ‘हा आयपॅड मिनी’ असे सांगत तो सादर केला. आयपॅडचे हे छोटे रूप आहे. संपूर्णपणे नवीन असे त्याचे डिझाइन आहे असेही शिलर म्हणाले. आयपॅड मिनीचा टचस्क्रीन ७.९ इंचांचा आहे व मूळ आयपॅडचा टचस्क्रीन हा ९.७ इंचांचा आहे. यात हा आकार पडद्याचा कर्ण गृहीत धरून सांगितला जात असतो. अ‍ॅपलने आयपॅडची चौथी आवृत्तीही याचवेळी सादर केली आहे. गेल्या अडीच वर्षांत अ‍ॅपलने १० कोटी आयपॅडची विक्री केली असे या वेळी सांगण्यात आले. अ‍ॅपलने २०१० मध्ये पहिला आयपॅड सादर करून धमाल उडवून दिली होती. या आयपॅडचा स्क्रीन ९.७ इंचाचा होता, तर इतर कंपन्यांनी कमी किमतीत सात इंचाचे टॅबलेट बाजारात आणले. अ‍ॅमेझॉनने सात इंचाचा किंडल फायर हा आयपॅड आणला व तो वर्षभरात लोकप्रिय ठरला त्याची नवी आवृत्ती गेल्या महिन्यात सादर करण्यात आली. गुगलने नेक्सस-७ हा टॅबलेट सादर केला, त्याला अँड्रॉइडची जोड होती सॅमसंग गॅलेक्सीने नंतर सात इंचाचा टॅबलेट सादर केला.    

आयपॅड मिनीची वैशिष्टय़े
* हा आयपॅड मिनी महागडा आहे. जवळपास नियमित आयपॅड इतकी त्याची किंमत जास्त आहे. त्याची किंमत-३२९ डॉलर, १६ जीबी व वाय-फाय सुविधेसह, सेल्युलर कनेक्शन सुविधेचा १६ जीबी क्षमतेचा आयपॅड मिनी -४२९ डॉलर.
* डिस्क स्पेस- १६ जीबी, ३२ जीबी व ६४ जीबी
* स्क्रीन आकार- ७.९ इंच  विवर्तन १०२४ बाय ७६८ रंगबिंदू (इंचाला -१६३ रंगबिंदू)
* संस्कारक- डय़ुअल कोअर ए ५ संस्कारक (प्रोसेसर), १.२ मेगापिक्सेल फेस टाइम एचडी कॅमेरा, ५ मेगापिक्सेल कॅमेरा.
४ जी आवृत्ती