सरकारच्या लेखी गांधीजी राष्ट्रपिता नाहीत! Print

alt

घटनेतील तरतुदीचा हवाला
पीटीआय, नवी दिल्ली
घटनेतील विशिष्ट तरतुदींमुळे महात्मा गांधी अथवा कोणालाही राष्ट्रपिता ही उपाधी देणे सरकारला शक्य नाही, असे स्पष्टीकरण गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले. लखनौ येथील ऐश्वर्या पराशर या सहाव्या इयत्तेतील मुलीने माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर हा खुलासा करण्यात आला.
सरकारने गांधीजींना नेमकी केव्हा राष्ट्रपती ही पदवी दिली, हे जाणून घेण्यासाठी ऐश्वर्याने माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. यावर गांधीजींना अधिकृतपणे ही पदवी दिल्याचे कोठेही आढळत नाही, असे उत्तर तिला सरकारतर्फे देण्यात आले. यानंतर ऐश्वर्याने तत्कालीन राष्ट्रपती डॉ. प्रतीभा पाटील आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पत्र लिहून गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी देण्यासाठी अधिसूचना काढावी, अशी मागणी केली. या पत्रावर प्रतिसाद न मिळाल्याने आपल्या पत्रावर काय निर्णय झाला, याची तिने माहितीच्या अधिकारात विचारणा केली. यावर गृहमंत्रालयातर्फे हा खुलासा करण्यात आला.