भट्टींच्या कार्यक्रमांनी समाजासमोर आरसा धरला - पंतप्रधान Print

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जसपाल सिंग भट्टी यांच्या निधनाने राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त होत असून पंतप्रधानांसह अनेक नेते आणि आघाडीच्या कलावंतांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, चित्रपट आणि दूरचित्रवाणीद्वारे समाजासमोर जणू आरसा धरण्याचे त्यांचे कार्य न विसरता येण्यासारखे आहे. समाज परिवर्तनाचे काम त्यांनी स्वतच्या पद्धतीने केले आणि त्याला विनोदाचा स्पर्श होता म्हणून सर्व वयोगटातल्यांना ते आपलेच वाटले. त्यांचे निधन अकाली आणि दुर्दैवी आहे.
प्रसारणमंत्री अंबिका सोनी :  दूरचित्रवाणी माध्यमात त्यांनीच खऱ्या अर्थाने सशक्त विनोदाची पायाभरणी केली. सामान्य माणसाच्या प्रश्नांना त्यांनी विनोदाच्या अस्त्राने ताकद दिली.
उद्योगपती स्वराज पॉल :  ते प्रहसनकारांतले सम्राट होते. त्यांचे अकाली निधन हा भारतासाठीच नव्हे जगभरातील विनोदप्रेमींसाठी धक्का आहे.
अनुपम खेर :  परमेश्वर सर्वच चांगल्या लोकांना आपल्यापासून दूर नेत आहे ही मनाला यातना देणारी गोष्ट आहे.
अक्षय कुमार :  त्यांचा फ्लॉप शो मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्याचमुळे आमच्या जगण्यात विनोद आणि प्रसन्नता आली.
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा तसेच दिग्दर्शक मधुर भांडारकर, मनोज बाजपेयी, जिम्मी शेरगिल, कुणाल कपूर, आफताब शिवदासानी, दिव्या दत्ता, श्रेयस तळपदे आदिंनीही भट्टी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘फ्लाइंग शीख’ मिल्खा सिंग, गायक गुरुदास मान आणि विनोदवीर गुरप्रीत घुग्गी यांनी भट्टी यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना पुष्पांजली वाहिली.    
भट्टी यांच्या घरी आलेल्यांशी सविता भट्टी या खंबीर मनाने बोलत होत्या. त्यांच्या विनोदाचा धसका घेतलेल्यांनी त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या पण ते डगमगले नाहीत. त्यांना मृत्यूची भीती नव्हती. यश आणि प्रसिद्धीची हवा कधीच त्यांच्या डोक्यात गेली नाही. त्यांचे पाय जमिनीवरच होते, असे त्या म्हणाल्या.