ओबामांना निसटती आघाडी Print

पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांच्याशी झालेल्या तीनपैकी शेवटच्या दोन वादसभांत चांगली कामगिरी बजावल्याने अंतिम बाजी मारण्यासाठी उत्तम पायाभरणी केल्याचे अलीकडेच झालेल्या जनमत चाचण्यांतून ध्वनित होत आहे, मात्र तरीही त्यांच्या विजयाबद्दल संदिग्धता कायम आहे.
आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांच्या आधारे ओबामा २.१ मतांनी आघाडीवर आहेत, असे रिअलक्लिअर पोलिटिक्सने म्हटले आहे. ‘टाइम मॅगझिन’ने निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण अशा ओहियो राज्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार ओबामा हे पाच टक्क्यांनी आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.
१४ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या चाचणीत रोम्नी यांनी लक्षणीय आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर पार पडलेल्या वादसभांत ओबामा यांनी बाजी मारल्याने ही आघाडी कमी होत गेली आहे. ‘गॅलप पोल’ने नुकत्याच केलेल्या चाचणीत नोंदणीकृत मतदारांमध्ये ओबामांनी रोम्नी यांच्यावर ४८-४७ टक्के अशी निसटती आघाडी घेतली आहे. १४ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच ओबामा यांच्या बाजूने हा कल देण्यात आला आहे.