सौंदर्योपचारासाठी ३५० डॉलर मोजा आणि खा सणसणीत थपडा Print

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

‘सुंदर मी होणार’ अशी प्रतिज्ञा आजकाल तरुणींनीच नव्हे तर तरुणांनीही मनोमन केलेली असते, पण कितीही क्रीम चेहऱ्यावर रगडली तरी ही प्रतिज्ञा कितपत फलद्रूप होते हे सर्वानाच माहीत आहे. पण अमेरिकेत सध्या एका वेगळ्याच सौंदर्योपचारांची चर्चा आहे. त्याला म्हणतात ‘फेस स्लॅपिंग’. यात चक्क तुम्हाला चांगल्या ताकदीने थोबाडीत मारल्या जातात आणि तुमच्या चेहऱ्याचे अंगभूत सौंदर्य अधिक उजळून येते. यासाठी तुम्ही थोबाडीत खायच्या आहेत पण त्यासाठी त्या मारणाऱ्यांना द्यायचे आहेत ३५० डॉलर म्हणजे खरंतर तोंड लाल व खिसा साफ.
रासमेसायटरन वोंगसिरोडकुल उर्फ टाटा यांनी ही अभिनव सौंदर्योपचार पद्धती सॅनफ्रान्सिस्को येथील सौंदर्य बाजारपेठेत सादर केली आहे. मसाज पार्लर चालवणाऱ्यांच्या मते ही थोबाडीत मारण्याची पद्धत लाखो टक्क्य़ांनी सुरक्षित आहे. थोबाडीत मारल्याने तुमचे मूळ सौंदर्य बहरून येते असा थायलंडमधील एक संकेत आहे. त्यावर आधारित ही उपचार पद्धत आहे. श्रीमती टाटा यांनी एक व्हिडिओ सादर केली आहे त्यात त्या म्हणतात की, थोबाडीत मारल्याने इजा होत नाही, ही प्रक्रिया रसायनांपासून मुक्त आहे. थोबाडीत मारण्याच्या तंत्राचा हा उपयोग सौंदर्यवर्धनासाठी करणारी पाश्चिमात्य देशातली मी एकमेव आहे. टाटा हे उपचार करताना स्वत: खास वेशभूषा करतात. त्या प्लास्टिकच्या फुलांनी सजवलेली हॅट घालतात व थाय पॉप संगीत लावतात. नंतर उपचारासाठी आलेल्या व्यक्तीला फटाफट मुस्काटीत लावतात. नंतर ग्राहकाच्या गालाला चिमटा घेतात व पुन्हा थोबाडीत मारतात; पण त्या आणखी कडक बसतात. त्यांचे पती माविन सोमबुनथम यांनी एबीसी न्यूजला सांगितले की, टाटा यांनी या सौंदर्योपचारांचे प्रशिक्षण थोबाडीत मारणारे व्यावसायिक कुंग खेमिका यांच्याकडून घेतले आहे. खेमिका या बँकॉकमध्ये स्वत:चे ब्युटी पार्लर चालवतात व त्या दिवसाला अनेक लोकांवर असे सौंदर्योपचार करतात. या सौंदर्योपचारांची दीक्षा फारशी कुणाला दिली जात नाही. त्यांचे केवळ १० विद्यार्थी आहेत. चेहऱ्याच्या कुठल्या भागात थपडा खायच्या हे ज्याने त्याने आधीच सांगायचे असते, यात चेहऱ्यावरील सुरकुत्याही जातात. कपाळ, गाल यावर या थपडा दिल्या जातात. एका वेळी साधारणपणे १५-२० मिनिटे हे उपचार केले जातात, त्याचा परिणाम वर्षभर टिकतो. यूएस इन्स्टिटय़ूट ऑफ थाय मसाज या संस्थेच्या रोझी ग्रिसकॉम यांनी सांगितले की, मानवी शरीरावर विशिष्ट लयीत टॅपिंग करण्याची मसाजाची पद्धत ही स्वीडनमध्ये वापरली जाते पण त्याचा उपयोग चेहऱ्याच्या मसाजासाठी केला जातो हे आपण कधी ऐकलेले नाही.    
टाटा मसाजचा प्रत्यक्ष अनुभव फेस स्लॅपिंगचा अनुभव एका वार्ताहराने प्रत्यक्ष टाटाबाईंकडे जाऊनच घेतला. त्यांनी त्याला एका स्टुलावर बसवले. बराच वेळ त्याच्याकडे रोखून बघत हल्ल्याचे नियोजन केले. हळूहळू स्टिरिओतून पॉप टय़ून सुरू झाली. टाटा यांच्या अंगात जणू संगीत भिनू लागले व त्या संगीताच्या गारूडातच त्यांनी भली थोरली हॅट डोक्यावर चढवली, त्याला प्लास्टिकचे गुलाब व लिलीची फुले यांचा साज होता. हळूच टाटाबाईंनी
उजवा हात उचलला तेव्हा या वार्ताहराच्या ते लक्षात यायच्या आत थाड, थाड, थाड तीन थपडा बसल्याही. वार्ताहराच्या मते त्यामुळे जरा चुरचुरले, फार काही लागले नाही. नंतर परीक्षेत पास झाल्यावर आजी नातवाचा गालगुच्चा घेते तसे त्यांनी या वार्ताहराचे गाल चिमटीत धरून ओढले. नंतर पुन्हा संगीत सुरू. पुन्हा उजवा हात. यावेळी जरा कडक, थाड.. थाड.. थाड पुन्हा थपडा. नंतर त्या या वार्ताहराकडे बघत त्यांना त्यांचे काम समाधानकारक झाल्याची खात्री पटते. पुन्हा संगीत, उजवा हात चालत राहतो. पुन्हा थाड.. थाड.. थाड . दहा मिनिटे हा सगळा प्रकार चालला. थपडा मारण्यापूर्वीचा
चेहरा व नंतरचा चेहरा यांची छायाचित्रे टाटा त्या वार्ताहराला दाखवतात बराच फरक पडलेला असतो!