रेल्वेत २.१ लाख जागा रिक्त Print

सुरक्षा सेवांशी निगडित ९० हजार जागा भरणे गरजेचे
पीटीआय, नवी दिल्ली

सुरक्षेसंबंधी सेवांशी निगडित अशा ९० हजार जागांसह रेल्वेमध्ये एकूण २.१ लाख जागा रिक्त आहेत, त्या तातडीने भरण्याची गरज आहे असे दिसून आले आहे. लोको रनिंग स्टाफ, स्टेशन मास्तर, गार्ड, टेक्नॉलॉजी सुपरवायझर, नियंत्रण व यार्ड कर्मचारी, सिग्नल इन्स्पेक्टर, पॅरा-मेडिकल , कार्यालयीन कर्मचारी अशा प्रकारच्या या जागा असून त्या लगेच भरण्याची गरज आहे. सुरक्षेशिवाय कार्यशाळा व व्यापारी विभागात तसेच वैद्यकीय विभागात अनेक जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी मोहीम सुरू असल्याचा दावा रेल्वेने केला आहे. सहा महिन्यांपूर्वीच रिक्त जागा या २.६ लाख होत्या, त्या आता २.१ लाखांपर्यंत खाली आल्याचे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. येत्या सहा महिन्यांत ही संख्या १.५ लाखांपर्यंत खाली येईल असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. भरतीप्रक्रिया ही सतत चालू असते. कर्मचारी निवृत्ती व भरती प्रक्रियेतील निकषांची पूर्तता यामुळे प्रत्येक वेळी काही जागा या रिक्त राहतात. ‘क’ गटातील ३२ हजार व ‘ड’ वर्गातील ८५ हजार पदांसाठी अलीकडेच लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. त्यात सुरक्षाविषयक पदे भरण्याला प्राधान्य देण्यात आले आहे असा रेल्वेचा दावा आहे. चालू आर्थिक वर्षांत १ लाख जागा भरण्याचा प्रस्ताव असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात रिक्त होणारी पदे लक्षात घेऊनही भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यात येत आहे असे सांगण्यात आले.