रजत गुप्ता यांना दोन वर्षे तुरुंगवास Print

पीटीआय, न्यूयॉर्क

भांडवली बाजारासंबंधी गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला पुरवण्याच्या आरोपाखाली अमेरिकेतील भारतीय उद्योजक रजत गुप्ता यांना मॅनहॅटन येथील न्यायालयाने गुरुवारी दोन वर्षे तुरंगवास व ५० लाख अमेरिकी डॉलरचा दंड अशी शिक्षा ठोठावली. आपला अशील निर्दोष असून या शिक्षेविरोधात वरच्या न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी माहिती गुप्ता यांच्या वकिलांनी दिली. शर्मा मात्र या शिक्षेच्या निर्णयामुळे पूर्णपणे खचले असून त्यांनी कुटुंबीय व सहकाऱ्यांची माफी मागितली आहे. वॉल स्ट्रीट भांडवल बाजारातील महत्त्वाच्या कंपन्यांची माहिती प्रतिस्पर्धी कंपनीतील राजरत्नम या अधिकाऱ्याला दिल्याचा आरोप ६३ वर्षीय गुप्ता यांच्यावर यापूर्वीच निश्चित झाला होता. गोल्डमॅन सॅक कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील गुपिते सांगणे, पी अँड जी या सिनसिनाटी येथील कंपनीच्या व्यवसायवृद्धीविषयी आकडेवारी पुरवणे, बर्कशायर हॅथवे या कंपनीच्या गुंतवणुकीविषयी माहिती देणे आदी त्यांच्या कारनाम्यांमुळे हजारो गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली. या माहितीच्या बदल्यात गुप्ता यांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले. अतिशय गुंतागुंतीच्या या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर पोलिसांनी गुप्ता व राजरत्नम यांच्यावर जूनमध्ये खटला दाखल केला. राजरत्नम यांची यापूर्वीच ११ वर्षांच्या शिक्षेसाठी तुरुंगात रवानगी झाली आहे.
गुप्ता यांचा हा गुन्हा अतिशय गंभीर असून त्यांना किमान १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा द्यावी. भांडवली बाजारातील गुपिते फोडून पैसा कमवण्याची सध्या लाटच आली असून अशा कारवाया करणाऱ्यांसाठी हा एक धडा ठरेल, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. गुप्ता यांनी मात्र न्यायालयाकडे सुटकेची मागणी केली होती. आपण सामाजिक कार्य करू इच्छितो, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्या. जेड रॅकोफ यांनी उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून गुप्ता यांना दोन वर्षे तुरुंगवास व ५० लाख अमेरिकी डॉलरचा दंड सुनावला. याशिवाय ही शिक्षा संपल्यानंतर गुप्ता यांना एक वर्ष नजरकैदेत ठेवण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. गुप्ता यांनी केलेला गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा व घृणास्पद असून त्यांनी अनेकांचा विश्वासघात केला आहे, या शब्दांत न्यायालयाने त्यांची निर्भर्त्सना केली.
न्यायाधीश निकाल देत असताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेल्या गुप्ता यांना अश्रू अनावर झाले. हा निकाल ऐकण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीला व चार मुलींनाही रडू कोसळले.
माफ करा..
हा निकाल ऐकल्यानंतर गुप्ता यांच्या भावना अनावर झाल्या. चौकशीदरम्यानचा १८ महिन्यांचा हा काळ माझ्यासाठी खूप वाईट व आव्हानात्मक होता. आयुष्यभर जमवलेली प्रतिष्ठा यामुळे धुळीस मिळाली असून मी माझ्या कुटुंबीयांची व सहकाऱ्यांची माफी मागतो, त्यांनी मला माफ करावे, असे ते म्हणाले.