डेंग्यूचे ‘स्वागत’ करणारे पेशींचे प्रवेशद्वार सापडले! Print

पीटीआय, लंडन

डेंग्यू या प्राणघातक रोगाचा विषाणू माणसाच्या पेशीत शिरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या संग्राहकांचे दोन प्रकार वैज्ञानिकांनी शोधले आहेत, त्यामुळे या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करता येणार आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावातील पहिल्या टप्प्याच्या प्रक्रियेचे आकलन होण्यास यामुळे मदत होणार आहे. पेशींच्या सुनियंत्रित मृत्यूच्या प्रक्रियेतील जैविक कार्यपद्धतीची नक्कल करून या विषाणूच्या पेशीतील प्रवेशाच्या पद्धतीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. इनसर्म व सीएनआरएस-पॅरिस विद्यापीठाचे अली आमरा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात जनुकीय छाननी करण्यात आली असून त्यात या विषाणूकडून पेशीत प्रवेश करताना वापरले जाणारे पेशीवरील संग्राहक नेमके कोणते आहेत याची निश्चिती करण्यात यश आले आहे. विषाणू व हे संग्राहक यांच्यातील बंध रोखले तर त्याचा प्रादुर्भाव संबंधित पेशीत होतच नाही, त्यामुळे विषाणूविरोधी नवीन उपचारपद्धती तयार करणे शक्य होणार आहे.
टिम व टॅम या संग्राहकांमुळे डेंग्यूच्या विषाणूंना पेशीत प्रवेश मिळतो. हे संग्राहक आविष्कृत होतात, त्यामुळे विषाणूचा संसर्ग होतो. जे आरएनए किंवा प्रतिपिंड टिम व टॅम संग्राहकांना लक्ष्य करतात त्यांच्यात फेरफार केल्यास पेशींना होणारा संसर्ग फारच कमी असतो. टिम व टॅम हे संग्राहक रेणू दोन वेगळ्या समूहातील आहेत व ते पारपटलाशी संबंधित असे संग्राहक असून ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या फॉस्फॅटिडायलसेरिन या घटकाशी संवाद साधतात व ‘मला खा’ (इट मी) असा संदेश पाठवतात. त्याचा परिणाम म्हणून फॅगोसायटोसिस व अ‍ॅपॉपटॉपिक पेशींना नष्ट करण्यास मोकळे रान मिळते. संशोधकांनी फॉस्फॅटिडायलसेरिन हे विषाणूंच्या पृष्ठभागावर मोठय़ा प्रमाणात आविष्कृत होतात, टिम व टॅम संग्राहक त्यांची ओळख पटताच त्यांना पेशींच्या आत प्रवेश देतात व तीच डेंग्यूच्या प्रादुर्भावाची पहिली पायरी असते. या नवीन संग्राहकांच्या शोधामुळे आता डेंग्यूचा विषाणू व टिम-टॅम रेणू यांचे बंध तोडणारी नवी उपचार पद्धती विकसित करता येणार आहे. ‘सेल होस्ट अँड मायक्रोब’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.    
जाणून घ्या डेंग्यूबद्दल..
- डेंग्यू हा डासांमुळे होणारा रोग आहे. त्यात चार प्रकारचे विषाणू माणसाच्या शरीरात डासामार्फत सोडले जातात.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दोन अब्ज लोकांना दरवर्षी डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो व ५ कोटी लोकांना डेंग्यूचा ताप येतो.
- डेंग्यूची सर्व लक्षणे इन्फ्लुएंझासारखी असतात. अगदी घातक विषाणूमुळे तीव्र स्वरूपाचा ताप येतो.
- डेंग्यू होण्यास टिम व टॅम हे पेशींवरील संग्राहक रेणू कारणीभूत ठरतात.
- डेंग्यूवर प्रभावी लस किंवा उपचार उपलब्ध नाही.