पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ Print

पीटीआय, नवी दिल्ली
ऐन दिवाळसणाच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा किरकोळ वाढ झाली आहे. पेट्रोल ३० तर डिझेल १८ पैशांनी महागले आहे. पेट्रोल पंपधारकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ही दरवाढ झाली आहे. ही दरवाढ आज, शुक्रवारपासून अंमलात येण्याची शक्यता आहे.
पंपधारकांना देण्यात येणाऱ्या पेट्रोलच्या कमिशनचा दर १.४९९ रुपयांवरून १.७९९ रुपयापर्यंत नेण्याचा तर डिझेलच्या कमिशनचा दर ९१ पैशांवरून १.०९ रुपयापर्यंत वाढविण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने गुरुवारी घेतला. पेट्रोल व डिझेलची दरवाढ तातडीने अंमलात येण्याची शक्यता आहे. याआधी, पेट्रोलपंपधारकांच्या कमिशनमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात वाढ करण्यात आली होती. पेट्रोलपंप चालविण्याच्या खर्चामध्ये झालेली मोठी वाढ लक्षात घेता पेट्रोल व डिझेलच्या प्रति लिटर कमिशनमध्ये अनुक्रमे आम्ही ६७ व ४२ पैशांची वाढ मागितली होती, असे ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्स’ चे सरचिटणीस अजय बन्सल यांनी सांगितले.