‘झी न्यूज’ने मागितली १०० कोटींची खंडणी Print

उद्योगपती नवीनजिंदल यांचा आरोप स्टिंग ऑपरेशन सादर
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीने आपल्या कंपनीविरुद्ध नकारात्मक बातम्या रोखण्याच्या मोबदल्यात शंभर कोटी रुपयांच्या जाहिरातींची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप कोळसा खाणवाटप घोटाळ्यात अडकलेले काँग्रेसचे खासदार व उद्योगपती नवीन जिंदल यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला. आपल्या आरोपापुष्टय़र्थजिंदल यांनी झी न्यूजच्या संपादकांचे केलेले स्टिंग ऑपरेशनही दाखविले. खंडणी मागितल्याचे जिंदल यांचे आरोप झी न्यूजने फेटाळून लावले आहे. नवीनजिंदल यांच्या जिंदल स्टील अँड पॉवर कंपनीवर गैरमार्गाने कोळसा खाणी मिळविल्याचा आरोप आहे. आपल्या कंपनीविरुद्ध झी न्यूजकडून चुकीच्या बातम्या दाखविल्या जात होत्या. आम्ही झी न्यूजशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी बातम्या थांबविण्यासाठी २० कोटी रुपयांच्या जाहिरातींची मागणी केली. नंतर ही रक्कम वाढवून शंभर कोटी मागण्यात आले, असे नवीनजिंदल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझिनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांच्याशी १३, १७ व १९ सप्टेंबर रोजी आपल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकींमध्ये ही मागणी करण्यात आली. या चर्चेचे स्टिंग ऑपरेशन नवीनजिंदल यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. आमच्याप्रमाणे अनेकांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करण्यात येत आहे, असा आरोप जिंदल यांनी केला. याप्रकरणीजिंदल यांच्या वतीने दिल्ली पोलिसांत २ ऑक्टोबर रोजी सुधीर चौधरी आणि अहलुवालिया यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे सर्व वृत्तवाहिन्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचा दावा करून झी न्यूजने नवीनजिंदल यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. नवीन जिंदल यांनी झी न्यूजला विकत घेण्याचे प्रयत्न केले आणि त्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनी हे कारस्थान रचले, असे झी न्यूजचे म्हणणे आहे.
 आमच्यावर यापूर्वी असे आरोप झाले होते आणि भविष्यातही होतील. पण अशा आरोपांमुळे काहीही फरक पडणार नसून आम्ही सत्याचा पाठपुरावा करीत राहू, असे झी एंटरटेन्मेंट एंटरप्राईसेसचे व्यवस्थापकीय संचालक पुनित गोएंका यांनी म्हटले आहे.जिंदल यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून याप्रकरणी आपल्या पत्रकारांनी कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही, असा निर्वाळा झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी दिला आहे.