जसपाल भट्टी यांचे अपघाती निधन Print

विनोदाच्या बादशहावर काळाची क्रूर झडप
वृत्तसंस्था, चंदीगढ

बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी (५७) यांचे गुरुवारी पहाटे पंजाबात चंदीगढ येथे रस्ताअपघातात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी सविता, कन्या राबिया आणि पुत्र जसराज आहेत. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात जसराज, अभिनेत्री सुरिली गौतम आणि चित्रपटाचे प्रवर्तक नवनीत जोशी हे तिघे जखमी झाले आहेत.

 

पंजाबात वारंवार होणाऱ्या भारनियमनावर आधारित भट्टी यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेला ‘पॉवर कट’ हा पंजाबी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्याच्या प्रसिद्धीदौऱ्यासाठी म्हणून भट्टी प्रवास करीत होते. चित्रपटात नायकाची भूमिका साकारत असलेले त्यांचे पुत्र जसराज गाडी चालवत होते. सुरिली गौतम आणि जोशी हेदेखील त्यांच्यासोबत होते. भटिंडाहून जालंधरला जाताना गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांची गाडी नाकोदार भागातील शाहकोटजवळ एका झाडावर आदळून हा भीषण अपघात ओढवला. डोक्याला जोरदार मार बसलेल्या भट्टी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण वाटेतच त्यांचे निधन झाले होते.
अमृतसरमध्ये ३ मार्च १९५५ रोजी जन्मलेले भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. महाविद्यालयीन काळापासूनच त्यांच्यातील तल्लख विनोदबुद्धीचा प्रत्यय परिचितांना येत होता. त्या काळात समाजातील भ्रष्टाचारावर विनोदाच्या माध्यमातून कोरडे ओढणारी त्यांची पथनाटय़े लोकांना हसवता हसवता अंतर्मुख करून गेली. नंतर चंदीगढच्या ‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून ते रुजू झाले आणि राजकीय व सामाजिक विसंगतींवर बोट ठेवणारी त्यांची अर्कचित्रे व व्यंगचित्रे अत्यंत लोकप्रिय झाली. त्याच काळात ‘दूरदर्शन’ने त्यांचे लक्ष वेधून घेतले. व्यापक लोकसंपर्काची या माध्यमाची ताकद त्यांना खुणावत होती आणि या माध्यमातला‘फ्लॉप शो’ हा त्यांचा पहिलावहिला कार्यक्रम आजही ‘हिट शो’ म्हणूनच गणला जातो. प्रमुख भूमिकेत भट्टींबरोबर त्यांची पत्नी सविता आणि दुसरे विनोदवीर विवेक शक अशी तीनच पात्रे असलेला हा अत्यंत कमी बजेटचा कार्यक्रम अवघ्या दहा भागांचा होता पण या कार्यक्रमाने समाजातील भ्रष्टाचार व वैगुण्यांवर हसवता हसवता असे मार्मिक भाष्य केले की आजही तो लोकांच्या लक्षात आहे. त्यानंतर ‘उल्टापुल्टा’ हा छोटय़ा तुकडय़ांचा कार्यक्रमही लोकप्रिय झाला होता.