गुजरातमध्ये बसप स्वबळावर लढणार Print

पक्षाची घोषणा
पीटीआय, अहमदाबाद
उत्तर प्रदेशातील सत्ता गमावलेल्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने आता गुजरात विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे १८२ जागा स्वबळावर लढण्याची घोषणा या पक्षातर्फे शुक्रवारी करण्यात आली.
गुजरातमधील सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांनी अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. मात्र, आम्ही आमच्या सर्व उमेदवारांची घोषणा लवकरच करणआर आहोत आणि सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहोत अशी घोषणा बसपचे उत्तर प्रदेश विधिमंडळाचे सभासद धर्मप्रकाश भारतीय यांनी केली. गेल्या वेळी बसपने गुजरातमध्ये १६६ जागांवर निवडणूक लढवत अडीच टक्के मते मिळवली होती. यंदाच्या निवडणुकीत सर्वच जागा लढवण्याचे पक्षाने ठरवले असून पक्षाध्यक्षा मायावती लवकरच प्रचाराचा नारळ फोडतील असे भारतीय म्हणाले. नरेंद्र मोदींच्या प्रशासनावरही त्यांनी टीका केली. मोदी लोकांची दिशाभूल करत असून केंद्रातील घोटाळ्यांवर बोलताना स्वतच्या मंत्रिमंडळातील सहकारी काय भ्रष्टाचार करत आहेत याकडे त्यांचे लक्ष नसल्याचे भारतीय म्हणाले. आम्ही कोणत्याही पक्षाची युती करणार नाही, आम्हाला गुजरातमध्ये सत्ता स्थापन करण्याइतपत मते मिळाली नाही तरी आम्ही ‘किंग मेकर’च्या भूमिकेत नक्की असून असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या वेळच्या निवडणुकीत भाजपला ४९ तर काँग्रेसला ३९ टक्के मते होती.