जातीय तेढ संपवा Print

म्यानमार सरकारचे आवाहन
पीटीआय, सिट्टवे (म्यानमार)
म्यानमार सरकारने जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. म्यानमारमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या जातीय हिंसाचाराच्या उद्रेकात किमान ५६ जण ठार झाले आहेत. या कृतीमुळे देशाच्या लौकिकाला बट्टा लागण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे सरकारने म्हटले आहे. देशात लोकशाहीचे राज्य स्थापन व्हावे, हीच इच्छा असल्याचेही सरकारने म्हटले आहे.
म्यानमारच्या पश्चिमेकडील राखीन राज्यात बौद्ध समाज आणि मुस्लीम समाजात झालेल्या चकमकीत संपूर्ण गाव जाळण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सरकारने मध्यस्थी करावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दडपण येऊ लागले आहे.
लष्कर, पोलीस आणि संबंधित प्राधिकरणांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा आणि कोणत्याही व्यक्तीने किंवा संघटनेने अशांततेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.