अपहृत भारतीय मुलीची माहिती सांगणाऱ्यास ५० हजार डॉलरचे बक्षीस Print

पीटीआय, वॉशिंग्टन
फिलाडेल्फिया शहरातून अपहरण करण्यात आलेल्या १० महिन्यांच्या सान्वी वेन्ना या बालिकेची माहिती सांगणाऱ्यास ५० हजार डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी राहत्या घरातून सान्वीचे अपहरण करताना हल्लेखोरांनी तिच्या आजीचीही निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे.
अपहृत सान्वी हिच्याबद्दल माहिती देणाऱ्यास याआधी ३० हजार डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यामध्ये आता आणखी २० हजार डॉलरची भर घालण्यात आली आहे.
हे बक्षीस उत्तर अमेरिकेतील तेलुगू मंडळ, डेलावेर व्हॅलीस्थित नागरी गुन्हे आयोग, माँटगोमेरी काऊंटी जिल्हा न्याय विभाग आणि मेरियन टाऊनशिप पोलीस विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
सोमवारी वेन्ना कुटुंबाच्या घरात अज्ञात हल्लेखोरांनी घुसून सान्वीचे अपहरण केले तसेच तिची आजी सत्यवती वेन्ना (६१) हिची निर्घृण हत्याही केली होती.
या घटनेला आता आठवडा होत आला तरी सत्यवती यांचे मारेकरी आणि सान्वी हिच्या अपहरणकर्त्यांबाबत कोणताच धागा पोलिसांना अद्याप मिळालेला नाही.
 सान्वीचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस आणि एफबीआयने संयुक्तरित्या व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. पेनिसिल्वेनिया राज्य पोलिसांनीदेखील सान्वीच्या अपहरणानंतर अतिसावधानतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सान्वीच्या सुटकेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. अपहृत तान्हुलीच्या सुरक्षेबाबत कोणतीही जोखीम पत्करायची नसल्यामुळे तपास कार्याबद्दल कमालीची सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे जिल्हा विधी अधिकारी रिसा व्हेट्री यांनी सांगितले.