यूपीए सरकारने गडकरी यांच्याप्रमाणे धारिष्टय़ दाखवावे Print

सुधींद्र कुलकर्णी यांचे आवाहन
पीटीआय, बंगळुरू

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याप्रमाणे यूपीए सरकारने धारिष्टय़ दाखवावे आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीला सामोरे जावे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे माजी निकटवर्तीय सुधींद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे. गडकरी यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने त्यांच्या नेत्यांवर असलेल्या अधिक गंभीर स्वरूपाच्या आरोपांच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवावी, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
गडकरी यांनी त्यांच्या कंपनीतील गुंतवणुकीबाबत करण्यात आलेल्या आरोपांच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली असल्याने आता जनतेने सत्य समोर येण्याची प्रतीक्षा करावी. गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप न होता त्यांनी महाराष्ट्रात एक्स्प्रेस महामार्ग बांधला, असेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येड्डियुरप्पा यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल विचारले असता कुलकर्णी म्हणाले की, येड्डियुरप्पा यांच्यासारखा नेता गमावणे ही भाजपसाठी चिंतेची बाब आहे. कर्नाटकमध्ये भाजपची वाढ होण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र दुर्दैवाने काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, असेही ते म्हणाले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी मागणी होत असून त्याबद्दल विचारले असता कुलकर्णी म्हणाले की, या बाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते योग्य वेळी निर्णय घेतील.