‘फॉम्र्युला वन'च्या सरावात इटालियन नौदलाचे झेंडे फडकविणाऱ्या फेरारीची आगळीक Print

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

ग्रेटर नोईडाच्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमध्ये फॉम्र्युला वनच्या इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीच्या सरावादरम्यान आज फेरारीच्या संघाने आपल्या कारवर इटालियन नौदलाचे झेंडे फडकाविण्याची आगळीक करीत आंतरराष्ट्रीय वादाला निमंत्रण दिले. भारत सरकारने या घटनेवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. आठ महिन्यांपूर्वी भारतीय महासागरात इटालियन नौदलाने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय मच्छीमार मृत्युमुखी पडले होते. हा गोळीबार करणारे इटालियन नौदलाच्या सुरक्षारक्षकांना चार महिन्यांचा तुरुंगवास घडल्यानंतर जामीन देण्यात आला आहे. भारतीय मच्छिमारांना चाचे समजून त्यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा इटालियन नौदलाकडून करण्यात आला. पण या प्रकरणी भारत आणि इटलीदरम्यान कोणतीही तडजोड होऊ न शकल्याने उभय देशांचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. अशा स्थितीत आज बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवरील सरावादरम्यान फेरारीच्या कारवर इटालियन नौदलाचे झेंडे फडकावून हा आंतरराष्ट्रीय वाद नव्याने उकरून काढण्यात आला. त्याबद्दल फेरारीच्या संघाचे इटालियन परराष्ट्र मंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. भारताने या घटनेवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. हे खिलाडूवृत्तीचे लक्षण नव्हे, असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.