गडकरी, वढेरा यांनी त्यांचे उद्योगधंदे जाहीर करावे Print

केजरीवाल यांची मागणी
पीटीआय, नवी दिल्ली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी त्यांचे सर्व उद्योगधंदे आणि देशात त्यांच्या मालकीची जमीन कोठे आहे ते जाहीर करावे, अशी मागणी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे (आयएसी) नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. नितीन गडकरी यांच्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाने सुरू केलेली चौकशी ही धूळफेक करण्याचा प्रकार आहे, कारण काँग्रेस आणि भाजप यांची हातमिळवणी झाली असून ते एकमेकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. देशात आपल्या मालकीची जमीन कोठे आहे, त्यांचे उद्योगधंदे काय आहेत, ही जमीन त्यांनी कधी आणि कोणत्या दराने विकत घेतली ते वढेरा यांनी जाहीर करावे. इतकेच नव्हे तर गडकरी आणि वढेरा यांनी देशातील आणि परदेशातील त्यांच्या उद्योगांची माहिती जाहीर करावी, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली आहे.
गडकरी यांच्या पूर्ती पॉवर अ‍ॅण्ड शुगर लि. या कंपनीत विविध कंपन्यांनी गुंतविलेल्या पैशांचा स्रोत काय, त्याची चौकशी प्राप्तिकर विभागाकडून सुरू असल्याबद्दल केजरीवाल म्हणाले की, प्राप्तिकर विभाग आपला अहवाल एका महिन्यात सादर करील, असे सरकारने जाहीर केले आहे.
तथापि, अशा प्रकारची चौकशी करण्याची प्राप्तिकर कायद्यात तरतूदच नाही, सरकार लोकांची फसवणूक करीत आहे का, प्राप्तिकर कायद्यानुसार कलम १३२ नुसार छापा टाकता येतो, १३३ नुसार तपासणी करता येते किंवा १४३ नुसार दस्तऐवजाची छाननी करता येते, सरकार काय करीत आहे, असा सवालही केजरीवाल यांनी केला आहे.