गडकरी यांच्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य वाटते Print

केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिपादन
पीटीआय, नवी दिल्ली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या कंपनीमध्ये अनेक कंपन्यांनी गैरमार्गाने पैसा गुंतविल्याच्या करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे वाटते, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत ज्या गोष्टी उघड होत आहेत, विविध वाहिन्यांवरून जे वृत्त प्रक्षेपित केले जात आहे, ते पाहता गडकरी यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे वाटते, असेही शिंदे यांनी एका समारंभादरम्यान मीडियाला सांगितले. तथापि, याबाबत विस्तृतपणे भाष्य करण्यास शिंदे यांनी नकार दिला. गडकरी हे १९९५ ते १९९९ या कालावधीत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री होते आणि त्यांच्या कारकीर्दीत आयडियल रोड बिल्डर्स (आयआरबी) या कंपनीला कंत्राटे देण्यात आली आणि त्या कंपनीनेच पूती कंपनीला मोठय़ा प्रमाणावर कर्ज दिले, असा आरोप करण्यात येत आहे. केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालय आणि प्राप्तीकर विभाग गडकरी यांच्यावर करण्यात आलेल्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करीत आहेत.