प्रचारयुद्ध शिगेला..! Print

ओबामांचे ऐतिहासिक मतदान
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

जगातील एकमेव महासत्तेच्या सत्तेची दोरी आपल्याच हातात रहावी यासाठी लढत असलेले विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा आणि रिपब्लिकनांचे अध्यक्षपदाचे उमेदवार मिट रोम्नी यांच्यातीव वाग्युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. टीका, आरोप-प्रत्यारोप, उणीदुणी काढण्याची एकही संधी हे दोघेही सोडत नाहीत. मतदानाची तारीख अगदी समीप येऊन ठेपली असतानाच प्रचाराची रणधुमाळी दोन्ही बाजूंनी सुरू आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अद्याप १२ दिवस शिल्लक असतानाच विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी आधीच मतदानाचा हक्क बजावून नवीन इतिहास रचला आहे. मतदानाच्या तारखेआधीच मतदान करणारे ओबामा हे पहिलेच अध्यक्ष ठरले असून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी आणि आपल्यात काटय़ाची लढाई असल्याचे ओबामांनी मतदानानंतर सांगितले. अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक येत्या ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
निवडणूक प्रचाराच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ५१वर्षीय बराक ओबामा यांनी गुरुवारी शिकागो येथील मार्टिन ल्युथर किंग कम्युनिटी सेंटरमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्रावर आल्यानंतर ओबामा यांनी उपस्थित सर्वाशी हस्तांदोलन केले. ठरलेल्या तारखेआधीच अध्यक्षांनी मतदान करण्याची ही पहिलीच वेळ असून आपण अतिशय आनंदित असल्याचे ओबामांनी यावेळी सांगितले.
मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी असलेल्या महिलेने ओबामांकडे ओळखपत्र म्हणून वाहन चालक परवाना मागितला. त्यावर ओबामांनी क्षणार्धात वाहन परवाना काढून दाखवला, तसेच ओळखपत्रावरील फोटोत केस पांढरे नसल्याचे हसून सांगितले. कर्मचाऱ्यांनी इतरही कागदपत्रांची छाननी केल्यानंतर ओबामांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या परवानगीने मतदान केंद्रावर उपस्थित कर्मचाऱ्यांसोबत छायाचित्रे काढून घेतले.
दरम्यान, मतदानाला निघण्यापूर्वी आपल्या समर्थकांना पाठवलेल्या ई-मेल संदेशात ओबामांनी म्हटले आहे की, मी वेळेआधीच आपल्या मूळ शहरात शिकागोमध्ये मतदान करणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक अतिशय चुरशीची असून जनतेने मला जिंकण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या वादविवादाच्या तीन फेऱ्यांपैकी दोन फेऱ्यांमध्ये ओबामांनी बाजी मारली आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांचे पारडे किंचित जड असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
रोम्नी यांचा रोख आता अर्थव्यवस्थेकडे
बलात्कारी महिलांच्या गरोदरपणाविषयी रिपब्लिक पक्षाचे नेते रिचर्ड मरडॉक यांनी केलेल्या  विधानामुळे अमेरिकेत उठलेले वादळ शांत व्हावे म्हणून त्याच पक्षाचे अध्यक्षीय पदाचे उमेदवार मिट रोम्नी यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी एकीकडे जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे स्वत: रॉम्नी मात्र अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या मुद्दय़ाकडे सर्वाचे लक्ष कसे वेधता येईल या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. अमेरिकेतील अध्यक्षीय पदाची निवडणूक अवघ्या दोन आठवडय़ांवर आलेली असताना तेथील सरकारतर्फे सकल राष्ट्रीय उत्पन्नविषयक अहवाल शुक्रवारी प्रकाशित करण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर मिट रोम्नी आपल्या कँपेनमधून अध्यक्षीय पदाच्या दोन्ही उमेदवारांच्या अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील फरकाबाबत तपशीलवार भाष्य करणार आहेत. मंदगतीने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची वाढ होत असतानादेखील ओबामा यांनी देशाची अर्थव्यवस्था ‘योग्य दिशेने’ जात असल्याचे म्हटले होते. या विधानाचा समाचार रोम्नींनी घेतला.    

गर्भपाताच्या मुद्दय़ावरून ओबामांचा रिपब्लिकन पक्षावर हल्ला
अमेरिकेतील राजकारण्यांनी स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित बाबींवर मतप्रदर्शन केलेले अमेरिकेतील बहुतांशी महिलांना आवडणारे नाही, असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रिपब्लिक पक्षावर घणाघाती टीका केली. रिपब्लिक पक्षाचे सिनेटचे उमेदवार रिचर्ड मरडॉक यांनी दोनच दिवसांपूर्वी, बलात्कारी स्त्री गरोदर राहिल्यास ती ईश्वराची इच्छा मानली जावी, असे विधान केले होते. या विधानाचा ओबामा यांनी समाचार घेतला.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत महिलांच्या गर्भपाताच्या हक्काचा मुद्दा अत्यंत कळीचा ठरू लागला आहे आणि याच मुद्दय़ावर बराक ओबामा आणि डेमोक्रॅटिक पक्ष रिपब्लिक पक्षाचे उमेदवार मिट रॉम्नी यांच्यावर शरसंधान करीत आहेत.
 रिपब्लिक पक्षाचे नेते हे असले अभद्र विचार कसे काय करू शकतात हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. बलात्कार हा बलात्कार असतो, तो एक अत्यंत गंभीर गुन्हा असून त्याबाबत अशी विधाने करणे हे दुर्दैवी म्हणावे लागेल, असे ओबामा यांनी सांगितले. स्त्रियांचे व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचे आरोग्य याबाबत अमेरिकेच्या पुरुषबहुल राजकारण्यांनी भाष्य करावे, असे आपल्याला वाटत नसल्याचेही ओबामा यांनी स्पष्ट केले.
 एखाद्या महिलेच्या आयुष्यात बलात्कारासारखी दुर्दैवी घटना घडल्यास पुढे काय, याचा निर्णय त्या महिलेनेच घ्यावयास हवा, त्या दृष्टीने आपले कुटुंब आणि धर्मोपदेशक यांचे सहकार्य तिने गरज भासल्यास घ्यावे, असे आपले मत असल्याचे सांगत याबाबत अमेरिकेतील राजकारणी निर्णय घेऊ शकत नाहीत, असे ओबामा यांनी मरडॉक यांच्या विधानाचा समाचार घेताना सांगितले. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या खर्चाचा आकडा हा उद्वेग आणणारा असल्याचे ओबामा यांनी मान्य केले. या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे आपले यापूर्वीही मत होते आणि आजही आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले.