परराष्ट्रमंत्री कृष्णा यांचा राजीनामा Print

 

केंद्रात खांदेपालटाची चिन्हे; राहुल गांधींबाबत साशंकता
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सकाळी होण्याची चिन्हे असून या संभाव्य फेरबदलात काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा समावेश होण्याची शक्यता मावळली आहे. वृद्धत्वाचे कारण सांगून एस. एम. कृष्णा यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्रिपदाचा राजीनामा दिला. कृष्णा यांच्यासह काँग्रेसच्या काही वरिष्ठ मंत्र्यांना पक्ष संघटनेत पाठविले जाण्याची शक्यता आहे, तर अन्य वरिष्ठ मंत्र्यांकडे असलेली अतिरिक्त मंत्रालये या फेरबदलात काढून घेतली जातील, असे संकेत देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात राहुल गांधी यांचा समावेश व्हावा यासाठी स्वत: मनमोहन सिंग उत्सुक असले आणि त्याविषयी अनेकांची उत्सुकता ताणली गेली असली तरी राहुल गांधी यांच्या गोटातून सकारात्मक संकेत मिळालेले नाहीत.

राहुल गांधी यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा दिवसभर चर्चेचा विषय ठरला होता. मात्र राहुल गांधी यांचे सहकारी ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांना स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्रालयांसह बढती मिळू शकते. मीनाक्षी नटराजन, माणिक टागोर आणि मनीष तिवारी या तरुण रक्तालाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशचे सिनेस्टार चिरंजीवी यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची संभाव्य फेरबदलाविषयी चर्चा झाल्यानंतर रविवारी सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाचा खांदेपालट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरील निष्ठा दाखविण्यासाठी केंद्रात मंत्री असलेले ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश, सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक, माहिती व नभोवाणीमंत्री अंबिका सोनी पक्ष संघटनेत परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोळसा खाणवाटप घोटाळ्यामुळे वादग्रस्त झालेले कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल आणि पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय, तसेच अनावश्यकपणे बोलून वाद निर्माण करणारे सलमान खुर्शिद तसेच बेनीप्रसाद वर्मा यांच्यासह जयंती नटराजन यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होऊ शकते. पेट्रोलियममंत्री जयपाल रेड्डी यांचे खाते बदलले जाण्याची चिन्हे आहेत.
 मुत्तेमवार, कामत यांना संधी
महाराष्ट्रातून माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार आणि गुरुदास कामत यांना पुनरागमनाची संधी आहे. वासनिक पक्ष संघटनेत गेल्यास नागपुरातून भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढण्यासाठी मुत्तेमवार यांना मंत्रिपद बहाल करून ताकद दिली जाण्याची शक्यता आहे. विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील प्रयत्नशील असून मंत्रिमंडळात त्यांच्या समावेशाची चर्चा सुरू आहे.