अपहृत सान्वीच्या हत्येचे कोडे उलगडले Print

टोपणनावांमुळे छडा लागला
पीटीआय
वॉशिंग्टन
खंडणीसाठी लिहिलेल्या चिठ्ठीत वापरलेल्या टोपणनावांमुळे १० महिन्यांच्या चिमुरडीची आणि तिच्या आजीची हत्या करणाऱ्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. रघुनंदन यंदमुरी असे या आरोपीचे नांव असून तो मूळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी आहे.
अवघ्या १० महिन्यांची सान्वी वेण्णा आणि तिच्या ६१ वर्षीय आजी सत्यवती वेण्णा यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्या प्रकरणी रघुनंदन यंदमुरी याला येथील पोलिसांनी अटक केली. पैशाच्या हव्यासापोटी आपण ही हत्या केल्याचे रघुनंदन याने सांगितले.
आपल्याला सत्यवती यांना ठार मारायचे नव्हते मात्र त्यांनी सान्वीचे अपहरण करताना कडवा प्रतिकार केल्याने आपण त्यांनाही मारले असे रघुनंदन याने पोलिसांना सांगितले.
 शिवा उर्फ वेंकट सिवा प्रसाद वेण्णा आणि लता उर्फ चेंचू लता पुनरू या दांपत्याच्या उत्तम सांपत्तिक स्थितीची माहिती असल्याने त्यांच्या १० महिन्यांच्या मुलीचे अपहरण करण्याचा कट रचल्याची कबुली रघुनंदन याने दिली.
अपहरण केल्यानंतर ५० हजार डॉलर्सची खंडणी मागणाऱ्या चिठय़ा रघुने लिहिल्या. यामध्ये लता आणि सिवा असा उल्लेख होता. त्यावरून तपास करणाऱ्या पोलिसांनी या हत्येचे कोडे उलगडले. रघुने अत्यंत निघृण पद्धतीने सान्वी या चिमुरडीची हत्या केली होती. मारेकऱ्यांवर लवकरच खटला दाखल होणार आहे.